एनआरसीच्या मुद्यावरून शिवसेनेनं केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाच थेट सवाल केला आहे. “लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून अमित शाह हेच सांगत आहेत. आता ते देशाचे गृहमंत्री आहेत व घुसखोरांना बाहेर फेकण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. शाह म्हणतात, प्रत्येक घुसखोराला बाहेर काढू. प्रश्न इतकाच आहे की, नक्की केव्हा?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील सभेत प्रत्येक घुसखोराला बाहेर काढू, असे सांगितले. त्यावरून शिवसेनेनं अमित शाह यांना चिमटा काढत कधी काढणार? असा प्रश्न केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं एनआरसीवर भाष्य केलं आहे. “एकेका घुसखोरास देशाबाहेर फेकू, असे गृहमंत्री अमित शाह यांनी बजावले आहे. अमित शाह यांनीच असे बजावल्याने देशात आता एकही घुसखोर राहणार नाही हे नक्की. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून अमित शाह हेच सांगत आहेत. आता ते देशाचे गृहमंत्री आहेत व घुसखोरांना बाहेर फेकण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. सर्वाधिक घुसखोर प. बंगालात आहेत व तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा या व्होट बँकेवर विशेष लोभ आहे. एनआरसी झाले तर जे हिंदू वगैरे लोक येथे आले आहेत त्यांनाही देश सोडावा लागेल अशी भीती घालण्यात येत आहे. ती भीती अमित शाह यांनी निराधार ठरवली. आठ दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी दिल्लीत गेल्या. त्या पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाहंना भेटल्या व कोलकात्यात येऊन ममतादीदींनी जाहीर केले, ‘‘प. बंगालात एनआरसी होणार नाही. तसे माझे पंतप्रधानांशी बोलणे झाले आहे.’’ पण आता गृहमंत्री शाह यांनीच या बातमीचे खंडन केले व सांगितले की, ‘‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी कार्यक्रम प. बंगालातही राबवला जाईल. अफवांवर विश्वास ठेवू नका.’’ राज्याराज्यांत बेकायदा निवास करणाऱ्यांना आधी हुडकून काढायचे व नंतर देशाबाहेर फेकायचे ही मोहीम जोरदार आहे. श्री. शाह म्हणतात, प्रत्येक घुसखोराला बाहेर काढू. प्रश्न इतकाच आहे की, नक्की केव्हा?,” या प्रश्नाला शिवसेनेनं उत्तर मागितले आहे.

मुंबईत पन्नास लाख घुसखोर

शिवसेनेनं मुंबईतही पन्नास लाखांहून अधिक घुसखोर असल्याचा दावा केला आहे. “प्रत्येक राज्यात घुसखोर आहेत व त्यांनी कायदा-सुव्यवस्थेसमोर संकट उभे केले आहे. देशात कोट्यवधी लोक बेकायदेशीरपणे राहत आहेत व त्यांनी बोगस रेशनकार्डे, मतदार ओळखपत्रे वगैरे बनवून आपल्या वस्त्या उभ्या केल्या आहेत. या घुसखोरांकडे मानवता वगैरे दृष्टिकोनातून पाहावे, असा काहींचा आग्रह आहे. मात्र हे घुसखोर येथील जनतेच्या तोंडचाच घास हिरावत आहेत त्याचे काय? शिवाय ही मंडळी अनेक गुन्ह्यांत व देशविरोधी कृत्यांत सहभागी असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहायचे असेल तर येथील स्थानिक लोकांकडे पहा. मुंबई व आसपासच्या परिसरात पन्नास लाखांवर घुसखोर आहेत. हा अधिकृत आकडा आहे. नवी मुंबई, मुंब्रा, पनवेल वगैरे भागांत तर त्यांची साम्राज्ये उभी आहेत. मुंबईत गोवंडी, मानखुर्द, बेहरामपाडा, जोगेश्वरी, मीरा-भाईंदरसारख्या भागांवरही घुसखोरांचे पुरळ उठले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस आजपर्यंत कोणी दाखवले नाही,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.