जम्मू-काश्मीरमधील गुरेज भागात दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झालेले शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर उद्या (गुरूवार) सकाळी १० वाजता मीरा रोड येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जिल्हा सैनिक कार्यालयाने ही माहिती दिली.

शहीद मेजर राणे यांचे पार्थिव श्रीनगरवरून आज दुपारी २.१५ वाजता विमानाने दिल्लीला पोहोचले. त्यानंतर पार्थिव मुंबईकडे रवाना झाले. उद्या गुरूवारी मीरा रोड येथे त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता त्यांच्यावर मीरा रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

दरम्यान, कौस्तुभ राणे यांना नियंत्रण रेषेवर केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सेना शौर्यपदकाचा बहुमान मिळाला होता आणि मेजर या हुद्दय़ावर त्यांना बढतीही मिळाली होती. मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातल्या वैभववाडी येथील सडुरे गावचे राणे कुटुंब १९९० मध्ये मीरा रोडच्या शीतलनगर येथील हिरल सागर या इमारतीत रहायला आले. कौस्तुभचे शालेय शिक्षण मीरा रोडच्या होली क्रॉस शाळेत झाले. लहानपणापासूनच अतिशय हुशार असलेल्या कौस्तुभने शालेय जीवनातच सैन्यात जायचे नक्की केले होते. लष्करी शिक्षण पुण्यात पूर्ण केल्यानंतर २०१० मध्ये त्यांनी कम्बाईन डिफेन्स सर्विस परिक्षा उत्तीर्ण केली आणि चेन्नई येथे अधिकारी प्रशिक्षण पूर्ण केले. ऑक्टोबर २०११ मध्ये लेफ्टनंट या पदावर ते लष्करी सेवेत रुजु झाले. २०१३ मध्ये त्यांना कॅप्टन पदावर बढती मिळाली आणि २०१८ मध्ये मेजर पदावर कार्यरत झाले.

सध्या ते सीमेवर ३६ वी बटालीयन दि राष्ट्रीय रायफल्स मध्ये कार्यरत होते. कौस्तुभ राणे यांच्या पश्चात त्यांची पत्नी कनिका, वडील प्रकाश, आई ज्योती, बहिण काश्यपी असे कुटुंब असून त्यांना दोन वर्षांचा लहान मुलगा आहे.