‘शक्तीमिल’ परिसरात वृत्तछायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींनी याच परिसरात भांडुप येथील टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरही बलात्कार केला होता. त्याप्रकरणी गेल्या आठवडय़ात आरोप निश्चित करण्यात आल्यावर सोमवारी त्या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. मात्र न्यायालयातील वीजपुरवठा खंडित झाल्याने खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही.
वृत्तछायाचित्रकार तरुणीप्रमाणेच या तरुणीवर आरोपींनी जुलै महिन्यात शक्तीमिल परिसरात सामूहिक बलात्कार केला होता. मात्र त्यानंतर तिने या प्रकाराची पोलिसांत तक्रार केली नव्हती. वृत्तछायाचित्रकार तरुणीवरील बलात्कारानंतर या तरुणीने पुढे येत आरोपींनी आपल्यावरही काही दिवसांपूर्वी असाच अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांत केली. गेल्या आठवडय़ात न्यायालयाने या प्रकरणी चारही आरोपींवर आरोप निश्चित करीत सोमवारपासून खटल्याच्या नियमित सुनावणी सुरू होईल, असे स्पष्ट केले. त्यानुसार सोमवारी दोन साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. मात्र दुपारच्या सत्रात न्यायालयातील वीजपुरवठा खंडित झाला आणि उशिरापर्यंत तो पूर्ववत न झाल्याने न्यायालयातील कामकाज होऊ शकले नाही. अखेर न्यायालयाने खटल्याचे कामकाज मंगळवापर्यंत तहकूब केले.
शुक्रवारी रात्री सत्र न्यायालयाच्या एका कक्षात शॉर्ट सर्किट झाले होते. त्यामुळे शनिवारी दुपारीही संपूर्ण न्यायालयातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. परंतु उशिरा तो पूर्ववतही झाला. सोमवारी मात्र खूप वेळानंतरही तो पूर्ववत न झाल्याने कामकाज तहकूब करण्यात आले.