बलात्कारासारखा घृणास्पद गुन्हा दोन वेळा केल्याच्या आरोपाअंतर्गत शक्तीमिल परिसर सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींना सत्र न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा ठोठावली. या तिन्ही आरोपींना गुरुवारीच न्यायालयाने दोषी ठरविले होते. दरम्यान, या खटल्यातील चौथा आरोपी सिराज खानला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
टेलिफोन ऑपरेटरवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात या आरोपींना दोषी ठरविण्यात आल्यानंतर हाच गुन्हा पुन्हा केल्याबाबतचा नवा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या आरोपाअंतर्गत या आरोपींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षेची तरतूद आहे. त्यानुसार न्यायाधीशांनी तिघांना फाशीची शिक्षा सुनावली. तिन्ही आरोपी गरीब आहेत. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देऊ नये, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. मात्र, आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर असल्याचे स्पष्ट करीत न्यायाधीशांनी त्यांना शिक्षेमध्ये कोणतीही सुट देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
दोनवेळा बलात्कार केल्याच्या गुन्ह्यासाठी सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश शालिनी फणसाळकर-जोशी यांनी विजय जाधव (१९), कासीम बंगाली (२१) आणि सलीम अन्सारी (२८) अशा तिघांना टेलिफोन ऑपरेटर आणि वृत्तछायाचित्रकार तरुणी अशा दोघींवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपी असलेल्या तिघांना दोषी ठरविले. टेलिफोन ऑपरेटरवरील बलात्कार खटल्यात या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. या प्रकरणात त्यांना दोषी ठरविण्यात आल्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्यांच्यावर ३७६ (ई) या शिक्षेत वाढ करण्याबाबतचा नवा आरोप निश्चित करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ती मान्य करीत तिघांवर हा आरोप निश्चित केला होता. या नव्या आरोपाप्रकरणी साक्षीदार तपासल्यानंतर आणि अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर गुरुवारी न्यायालायाने या आरोपात तिघांनाही दोषी ठरवले.