News Flash

फाशीसंबंधीच्या नव्या आरोपावर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

एकाच वेळेस स्वतंत्र दोन खटले चालविण्याची गरज काय आणि एका खटल्याचा निकाल दिल्यानंतर आरोपींविरुद्ध नवा आरोप निश्चित करण्यात येऊ शकतो का...

| March 27, 2014 05:43 am

एकाच वेळेस स्वतंत्र दोन खटले चालविण्याची गरज काय आणि एका खटल्याचा निकाल दिल्यानंतर आरोपींविरुद्ध नवा आरोप निश्चित करण्यात येऊ शकतो का, अशी प्रश्नांची सरबत्ती बुधवारी उच्च न्यायालयाने केली. शक्ती मिल परिसरात गेल्या वर्षी झालेल्या दोन बलात्कार खटल्यांतील तीन सामाईक आरोपींच्या शिक्षेत फाशीपर्यंत वाढ करण्याची मागणी करणाऱ्या नव्या आरोपावरच उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर सत्र न्यायालयात एवढे दिवस ही सुनावणी त्वरीत संपवण्यासाठी आतुर झालेल्या सरकार पक्षाने म्हणणे मांडण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने सुनावणी गुरुवारी दुपापर्यंत तहकूब केली.
टेलिफोन ऑपरेटर आणि वृत्तछायाचित्रकार तरुणीवरील सामूहिक बलात्कार अशा दोन खटल्यांमध्ये विजय जाधव, कासीम बंगाली आणि मोहम्मद सलीम अन्सारी या तीन आरोपींचा समावेश असून, विशेष न्यायालयाने त्यांना दोषी धरले आहे. या तिघांना टेलिफोन ऑपरेटरवरील  बलात्काराबद्दल न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे तिन्ही आरोपी ‘गुन्हेगारी मनोवृत्ती’चे आहेत, असा दावा करीत नव्या कायद्यानुसार त्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असलेला नवा आरोप त्यांच्यावर ठेवण्याची मागणी केली होती. विशेष न्यायालयानेही त्यांची मागणी मान्य करीत आरोपींवर नव्याने आरोप ठेवला. हा नवा आरोप सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाकडून दोन साक्षीदारही तपासण्यात आले. मात्र, एकाचवेळी दोन खटले चालविण्यात येऊन केवळ काही मिनिटांच्या फरकाने त्यांचा निकाल देण्यात आल्याचा आणि त्या आधारे आरोपींना ‘गुन्हेगारी मनोवृत्ती’चे ठरवून त्यांची शिक्षा फाशीपर्यंत वाढविण्याची मागणी करण्याला आरोपींचे वकील मोईन खान आणि आर. जी. गाडगीळ यांनी तीव्र विरोध करीत त्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अभय ठिपसे यांच्या खंडपीठासमोर त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने नवा आरोप ठेवण्याच्या सरकारी पक्षाच्या एकूण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह लावले. बलात्काराच्या नव्या आरोपाबाबतच्या तरतुदीनुसार, हा आरोप निश्चित करण्याची मागणी करण्याआधी त्या आरोपीला आधी दुसऱ्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरविण्यात आलेले असणे अनिवार्य आहे. शक्तीमिल बलात्कार प्रकरणी सरकारी पक्षाने दोन्ही खटल्यांमध्ये आरोपींना दोषी ठरविल्यानंतर हा नवा आरोप ठेवण्याची मागणी करणारा अर्ज केला. मात्र, एकाच वेळेस दोन स्वतंत्र खटल्यांचा निकाल देण्यात आला. त्यातही एकाच खटल्यात आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. त्या आधारे आरोपींना ‘गुन्हेगार मनोवृत्ती’चे ठरवून हे कलम लागू करता येऊ शकते का, त्यांच्यावर खटल्याचा निकाल दिला जाण्यापूर्वी अशाप्रकारे नवा आरोप निश्चित केला जाऊ शकतो का, अशी विचारणा करीत न्यायालयाने सरकारी वकिलांकडून त्याचे स्पष्टीकरण मागितले. तसेच हे दोन्ही खटले स्वतंत्र चालविण्यात आले असले तरी ते एकाच वेळेस का चालविण्यात आले, त्यामागचा हेतू काय, असा सवाल केला. या वेळी ‘अमायकस क्युरी’ म्हणून नेमण्यात आलेले वकील आबाद पोंडा यांनी मात्र एकदा का खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला की आरोपींवर नव्याने आरोप निश्चित करता येऊ शकत नसल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 5:43 am

Web Title: shakti mills gangrape convicts challenge framing of death sentence charge
Next Stories
1 भाजीबाजारावर संकट
2 गोविंदा पथकांना बालगोविंदांच्या बंदीचा ‘भार’
3 सीएसटीचा प्लॅटफॉर्म क्र. १ बंद होणार?
Just Now!
X