आम्ही काहीच केलेले नाही, आम्हाला या प्रकरणी गोवण्यात आलेले आहे. कृपा करून आमच्यावरील आरोप मागे घ्या, अशी गयावया शक्तीमिल परिसरात घडलेल्या दोन सामूहिक बलात्कार प्रकरणांमधील तीन सामाईक आरोपींनी मंगळवारी न्यायालयाकडे केली.
दरम्यान, शिक्षा वाढविण्याबाबत आपल्यावर नव्याने ठेवण्यात आलेल्या आरोपांवरील सुनावणीसाठी आपल्याला तीन साक्षीदारांना पुन्हा बोलवायचे आहे, अशी मागणीही आरोपींच्या वतीने या वेळी करण्यात आली. सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश शालिनी फणसाळकर-जोशी यांनी ती मान्य केल्याने बुधवारी हे साक्षीदार पुन्हा तपासले जाणार आहेत. त्यानंतर दोन्ही बाजूने नव्या आरोपाबाबत सादर केलेल्या पुराव्यांवरून युक्तिवाद करतील आणि न्यायालयाकडून निकाल राखून ठेवला जाण्याची शक्यता आहे.
नव्या आरोपाबाबत आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या क्षणी खटल्याला स्थगिती दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत नव्या आरोपाबाबतच्या सुनावणीला हिरवा कंदील दाखवला होता. परंतु, उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत हाती न पडल्याची सबब पुढे करीत आरोपींच्या वकिलांनी सुनावणी मंगळवापर्यंत तहकूब करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मंगळवारी सुनावणी झाली असता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नव्या आरोपाबाबत बाल न्यायालयाचा कनिष्ठ लिपिकाची साक्ष नोंदवली. त्यानंतर आरोपींचा या नव्या आरोपाबाबत म्हणणे आणि सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांबाबतचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्या वेळी विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलीम अन्सारी या तिन्ही आरोपींनी आपण निर्दोष आहोत, आपल्याला गोवण्यात आले असून आपल्यावरील हे आरोप मागे घेण्याबाबत गयावया न्यायालयाकडे केली. एवढेच नव्हे तर कासीम बंगालीच्या वतीने अॅड्. आर. जी. गाडगीळ यांनी या नव्या आरोपाबाबत सरकारी पक्षाच्या दीपक चव्हाण, संजय पवार आणि मनोहर धनावडे (तपास अधिकारी) यांना पुन्हा पाचारण करण्याची परवानगी देण्याची विनंतीही न्यायालयाकडे केली. न्यायालयाने त्याची ही विनंती मान्य करीत सुनावणी बुधवापर्यंत स्थगित केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 2, 2014 2:21 am