News Flash

उमेदवारी देताना कायद्यातील तरतुदीकडे दुर्लक्ष

बिहारमध्ये काँग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की

(संग्रहित छायाचित्र)

संतोष प्रधान

विधानसभा किंवा विधान परिषदेसाठी उमेदवाराचे नाव त्या राज्याच्या मतदार यादीत असणे आवश्यक असल्याची लोकप्रतिनिधी कायद्यात तरतूद असतानाही, बिहार विधान परिषदेसाठी उमेदवाराचे नाव निश्चित करताना काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी बहुधा हा मुद्दाच विचारात घेतला नाही. परिणामी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यापूर्वी एक तास आधी काँग्रेसवर बिहारमध्ये उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली.

बिहार विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवापर्यंत होती. काँग्रेसने बुधवारी या जागेसाठी माजी खासदार तारिक अन्वर यांची उमेदवारी जाहीर केली. यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता अन्वर हे नवी दिल्लीहून पाटण्यात दाखल झाले. उमेदवारी अर्जासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्यात आली. विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचे नाव हे त्या राज्याच्या मतदार यादीत असावे ही १९५१च्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या सहाव्या कलमात तरतूद आहे. नेमके  तारिक अन्वर यांचे नाव दिल्लीच्या मतदार यादीत होते. राज्याच्या मतदार यादीत नाव नसल्यास उमेदवारी अर्ज बाद ठरू शकतो, असा सल्ला कायदेतज्ज्ञांनी दिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत असताना, या मुदतीच्या एक तास आधी काँग्रेसने उमेदवार बदलला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रतिज्ञापत्र तयार कोणी ठेवले याची शोधाशोध करण्यात आली. प्रदेशचे हंगामी अध्यक्ष समीर सिंग यांच्याकडे सारी कागदपत्रे तयार होती. शेवटी मुदत संपण्यास काही वेळ शिल्लक असताना त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आदेश पक्षाने दिला होता.

जुन्याच चेहऱ्यांना संधी

लागोपाठ दोन पराभवांनतंरही काँग्रेस नेतृत्वाने जुन्याच चेहऱ्यांना पुन:पुन्हा संधी देण्याची प्रथा कायम ठेवली आहे. कर्नाटकात राज्यसभेची उमेदवारी नाकारण्यात आलेले पक्षाचे सरचिटणीस बी. के . हरिप्रसाद यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. याप्रमाणेच बिहारमध्ये तारिक अन्वर यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. हरिप्रसाद किंवा अन्वर या दोघांनी अनेक वर्षे खासदारी भूषविली. पुन्हा आमदारकीसाठी जुन्याच चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तारिक अन्वर यांची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी पक्षाने ते बिहारमधील मतदार आहेत का, याचाही विचार केला नाही. यावरून काँग्रेसमधील गोंधळ समोर येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 12:08 am

Web Title: shame on congress for changing candidates in bihar abn 97
Next Stories
1 शाळा सुरू होईपर्यंत शिक्षकांना घरूनच काम!
2 सीबीएसईचा निकाल सरासरी मूल्यांकनानुसार १५ जुलैपर्यंत
3 करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी आता पालिकेचे आक्रमक उपचार!
Just Now!
X