अहमदनगर जिल्हय़ातील शनििशगणापूर मंदिरात महिलांना शनीच्या चौथऱ्यावर प्रवेश नाकारणाऱ्या प्रथेविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. तसेच ही प्रथा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ आणि नीलिमा वर्तक यांनी अ‍ॅड्. कल्याणी तुळणकर यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. महिलांना चौथऱ्यावर बंदी घालण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय स्त्री-पुरुष समानता नाकारणारा आणि महिलांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा आहे. त्यामुळेच चौथऱ्यावर जाण्याबाबतचा भेदभाव रद्द करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे.