राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल, राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवणाऱ्या भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चोख प्रतिउत्तर दिलं आहे. “मध्यावधी निवडणुका फक्त देशात होतात. त्या घ्यायच्या असल्या तर घ्या,” असं सांगत शरद पवार यांनी थेट लोकसभेच्या निवडणूका घेण्याचं आव्हान भाजपाला केलं आहे. दिल्लीत भाजपाचा दारुण पराभव झालेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी महाराष्ट्रातील सरकारसंदर्भात वक्तव्य करणाऱ्या भाजपाला मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये सुनावले आहे.

मुंबईमध्ये शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना महाविकास आघाडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “मध्यावधी निवडणुकांसाठी आम्ही तयारी करत आहोत. लवकरच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील असं भाजपाकडून सांगितलं जात आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे?,” असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला. यावर उत्तर देताना पवारांनी मध्यावधी राज्याच्या होत नाही संपूर्ण देशाच्या होतात असं सांगत भाजपालाच टोला लगावला.

काय म्हणाले पवार?

“मध्यावधी फक्त देशाच्या निवडणुका होतात. एखाद्या राज्याची मध्या लोकसभेच्या मध्यवधी निवडणुका घ्यायच्या असल्या तर ते त्यांच्याच (भाजपाच्या) हातात आहे. भाजपाने केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक घेऊन पुन्हा निवडणूक घ्यावी,” असा खोचक सल्ला पवारांनी दिला.

अशा गोष्टी गांभीर्याने घेत नाही

“महाविकास आघाडी सरकार पडेल असा दावा अनेकदा भाजपाकडून केला जातो यासंदर्भात तुमचे मत काय?”, असा प्रश्नही यावेळेस पवारांना विचारण्यात आला. “अशा गोष्टी मी गांभीर्याने घेत नाहीत. विरोधक एकदा हे बोलतात दुसऱ्या दिवशी ते बोलतात. राज्याच्या भल्यासाठी जे शक्य आहे ते करत राहणे हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विचार आहे,” असं पवारांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

काय आहे प्रकरण

‘हिंमत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा’ असं खुलं आव्हान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं होतं. या आव्हानाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिआव्हान दिलं होतं. “महाविकास आघाडी सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या”, असं फडणवीस म्हणाले होते. यावरुनच आता पवारांनी थेट भाजपाला लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्याचं आव्हान केलं आहे.