शरद पवार यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे, आत्महत्या वाढत आहेत, मात्र केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना त्याबद्दल काडीचीही आस्था नाही, दुष्काळावर चर्चा सुरु असताना भाजप राम मंदिराचा मुद्दा काढून समाजात दुषित वातावारण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे, घटनात्मक संस्थांवर हल्ले करुन त्या दुबळ्या करणाऱ्या भाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी सरकावर हल्लाबोल केला. आगामी निवडणुकीत प्रतिगामी भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व पुरोगामी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेने आयोजित केलेल्या या परिषदेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. शरद पवार यांच्याबरोबरच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधान सभेतील विरोधी पक्षनेचे राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, पश्चिम बंगालमधील माकपचे खासदार हन्नन मुल्ला, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले आदी नेते उपस्थित होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी अशोक ढवळे होते. आमदार जे.पी. गावित यांनी परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेच्या निमित्तीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते एकत्र आल्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपविरोधी महाआघाडी उभारण्याच्या प्रयत्नाला चालना मिळाल्याचे मानले जात आहे. येत्या २९ व ३० नोव्हेंबरला शेतकऱ्यांचा लॉंग मार्च दिल्लीला धडकणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.

केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील उदासीनतेवर पवार यांनी कडाडून हल्ला चढविला. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. त्यावेळचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व आपण स्वत यवतमाळ जिल्ह्य़ात जाऊन  कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर पंधरा दिवसात देशातील शेतकऱ्यांचे ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना ४ टक्के दराने कर्जपुरवठा करण्यात आला. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढले. त्याचा परिणाम म्हणजे  पुढील चार वर्षांत  अनेक देशांना अन्नधान्य निर्यात करणारा देश म्हणून भारत पुढे आला. मात्र मोदी सरकारच्या चार वर्षांच्या काळात अन्नधान्याच्या निर्यातीत २२ टक्क्य़ांनी घट झाल्याचे पवार यांनी निदर्शनास आणले. आम्ही दुष्काळाची चर्चा करीत असताना भाजपने राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करुन समाजात दुही माजविण्याचा प्रयत्न सुरू केल्याची टीका पवार यांनी केली.  सध्या सत्तेचा गैरवापर करुन  घटनात्मक संस्थांवर हल्ले करुन त्या दुबळ्या  करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर आसूड ओढले.

राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केल्याने धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत धर्माध, जातीयवादी भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व पुरोगामी पक्षांची एकजूट झाली पाहिजे, त्यानुसार पुढील आठ दिवसात एकत्र बसू आणि शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर पुढील दोन-चार वर्षांचा कार्यक्रम तयार करुया, असे आवाहन त्यांनी केले.

राफेल खरेदीवर तोफ..

केंद्रातील मोदी सरकारच्या राफेल विमान खरेदी व्यवहारवारही शरद पवार यांनी तोफ डागली. ते म्हणाले की, या पूर्वीही इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात परदेशातून विमाने खरेदी करण्यात आली. देशाच्या संरक्षणाची गरज म्हणून परदेशातून विमान खरेदी करण्यात काहीही गैर नाही. परंतु त्या वेळी तंत्रज्ञान व सुटे भाग आणून भारतात विमान निर्मिती करीत होतो. त्यामुळे आपल्या देशात हजारो लोकांना रोजगार मिळाला.  मोदी सरकारने फ्रान्सकडून राफेल विमान खरेदी करण्याचा करार केला. संसदेत संरक्षण राज्यमंत्र्यांनी आधी एका विमानाची किंमत ६७० कोटी रुपये सांगितली, सहा महिन्यानंतर दुसऱ्या संरक्षण मंत्र्यांनी १४०० कोटी रुपये किंमत असल्याची माहिती दिली. सहा महिन्यात अशा प्रकारे वेगवेगवेगळी माहिती देण्यात आली. राफेल विमाने फ्रान्समध्ये बनविली जाणार आहेत आणि सुटय़ा भागांच्या निर्मितीचे  कंत्राट अंबांनींना देण्यात आले. खासगी भांडवलदारांच्या घशात पैसा घालण्यात येत असल्याची टीका त्यांनी कली

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar attacks on modi government
First published on: 13-11-2018 at 02:03 IST