छगन भुजबळ यांच्या विरोधात राजकीय षड्यंत्र असून, चौकशीतून सत्य बाहेर येईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पाटण्यात बोलताना भुजबळ यांची पाठराखण केली.
भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पाटण्यात मंगळवारी प्रारंभ झाला. बुधवारी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या दिवशी खुले अधिवेशन आणि विविध कार्यक्रम झाले.
कलिना येथील जागा देण्याचा निर्णय हा विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. तसेच हा भूखंड देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत समितीने घेतला होता. या निर्णयाशी भुजबळांचा वैयक्तिक काहीच संबंध नाही, असा दावा भुजबळ यांचे समर्थक आमदार जयंत जाधव यांनी केला.
हा प्रस्ताव अधिकाऱ्यांच्या पातळीवर मंजूर झाल्यावरच मग पायाभूत समितीकडे आला होता. निविदेला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत समितीने मान्यता दिली होती, असाही दावा या वेळी करण्यात आला आहे.