राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामूहिक पद्धतीने निर्णय घेतले जातात.  नसत्या विषयांवर आता चर्चा करण्याची गरज नसून, निवडणुकीनंतर पक्षाचे सदस्य त्यांचा नेता निवडतील, असे सांगत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर करण्याच्या पक्षांतर्गत चर्चेला शरद पवार यांनी आज (रविवार) पूर्णविराम दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये शरद पवार बोलत होते.         
१५ वर्षे सत्तेत राहिल्यामुळे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आळशी झाले. त्यांचा जनसंपर्क कमी झाला. पक्षकार्यकर्ते आणि नेत्यांमधील अंतर वाढल्याचा फटका पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये बसल्याचे पवार यावेळी म्हणाले.”जमीनीवर येवून जनतेशी दोन शब्द बोला त्यांच्यासमोर आमची इज्जत राखा. आपल्याला आता दुरूस्त व्हावे लागेल. तसे न झाल्यास लोकच दुरूस्त करतात हे आपण इतक्यात पाहिले.” असे पवार म्हणाले.
“केंद्रातील सत्ताबदलाचे सांप्रदायिक पडसाद राज्यात उमटायला सुरूवात झाली आहे”. असे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचे नाव न घेता शरद पवार यांनी पुण्यातील घटनेचा संदर्भ देत यावेळी म्हणाले. माजी सैन्यप्रमुख, माजी केंद्रीय सचिव यांनी निवृत्तीनंतर भाजपच्या वाटेला जाऊन लोकसभा लढवली ही गंभीर बाब असल्याचे पवार पुढे म्हणाले. महाराष्ट्राचे पुरोगामीत्व टिकवण्यासाठी काम करा असा सल्ला उपस्थितांना त्यांनी दिला. आत्मविश्वास न गमावता मोठ्याजोमाने कामाला लागा.  लोकसभा निकालचा विधानसभा निकालांवर कोणताही परिणाम होणार नाही. हे पवार यांनी सप्रमाण कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिले. गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्याच पक्षामध्ये सन्मान मिळत नव्हता. ती अवस्था आपल्या पक्षात नसल्याचे पवार म्हणाले.
“अन्नसुरक्षा कायदा युपीए सरकारने केला. देशातील शेवटच्या गरीबाच्या घरात चूल पेटावी हा उद्देश त्यामागे होता. महाराष्ट्रातील ६८ टक्के लोकांना याचा लाभ झाला. ३२ टक्के लोकांना काहीच मिळाले नाही. त्यांनी सरकारच्या विरोधात प्रचार केल्यामुळे राज्यात आपल्याला फटका बसला. ओबीसी विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली गेली नाही, त्यामळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.” असे देखील पवार यावेळी म्हणाले. धनगर आणि लिंगायत समाजाला शेजारच्या राज्यामध्ये आदिवासी आणि अल्पसंख्यांक दर्जा आहे. आदिवासींच्या मुळ आरक्षणाला धक्का न लावता या समाजांना आरक्षण देण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.