शरद पवार यांची सरकारवर टीका

यंदा चांगला पाऊस होऊनही राज्यात विजेचे भारनियमन करावे लागत असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केंद्र  व राज्यातील भाजप सरकारांवर टीका केली. राज्याला पुरेसा कोळसा उपलब्ध व्हावा, असे पत्र मी स्वत: २२ ऑगस्टला केंद्र सरकारला पाठविले होते, पण तातडीने उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी राज्याला आठ ते दहा तास भारनियमनाचा सामना करावा लागत असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.

यंदा पाऊस चांगला झाला. विहिरी भरल्या तरीही विजेचे भारनियमन करावे लागत आहे. हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका पवार यांनी पक्षाच्या बैठकीत बोलताना केली. पावसापूर्वी कोळशाचा पुरेसा साठा करणे आवश्यक असते; पण राज्याकडे पुरेसा साठाच नव्हता. ही बाब केंद्राच्या निदर्शनास आणून दिली होती, असेही पवार यांनी सांगितले. कोळशाचे योग्य नियोजन न केल्यानेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज्यातील विजेचे अनेक संच बंद आहेत. त्यातच पुरेसा कोळसा उपलब्ध होत नाही. या साऱ्या गोंधळास केंद्र व राज्यातील भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. राज्यातील विजेचा प्रश्न ओळखूनच शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदी असताना एन्रॉनचा करार करण्यात आला. त्यावर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली; पण १९९५ ते १९९९ तसेच २०१४ पासून आता सत्तेत असताना या सरकारने वीजनिर्मितीचा एकही नवीन प्रकल्प उभा केला नाही, अशी टीकाही तटकरे यांनी केली. वीज भारनियमनावरून खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर टीका केली.