मुंबईतील रेसकोर्सची जागा मोकळीच राहायला हवी, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शऱद पवार यांनी शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत मांडली. 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या परदेशात आहेत. तिथून आल्यावर ते पुन्हा नवीन प्रस्ताव घेऊन येतील. परदेशात गेल्यावर त्यांना नवीन काहीतरी सुचत असते, असा टोलाही पवार यांनी लगावला. थीम पार्कचा प्रस्ताव दिल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने या विषयावर आपली भूमिका मांडली. मात्र, पवार यांनी थीम पार्क व्हावे की नाही, याबाबत थेटपणे कोणतेही विधान केले नाही.
रेसकोर्सच्या जागेवर थीम पार्क विकसित करण्याचा प्रस्ताव शिवसेनेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी या जागेवरील थीम पार्कचे संकल्पना चित्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सादर केले. रेसकोर्सचा ९९ वर्षांचा भाडेकरार संपुष्टात आल्यामुळे तिथे मुंबईकरांसाठी जागतिक दर्जाचे थीमपार्क उभारण्याचा उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे.