शरद पवार यांची टीका; पाच राज्यांमध्ये केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या पराभवाचे भाकित
केंद्र व राज्यात भाजप सत्तेत येताच भाजपबाबत सौम्य भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर वर्मी घाव घातला आहे. सरकारची नियत चांगली नसल्यानेच ‘मेक इन इंडिया’ला मोठी आग लागली, अशी बोचरी टीका करतानाच सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, असा सल्लाही दिला. तसेच पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव निश्चित असल्याचा अंदाज वर्तवून पवार यांनी शनिवारी भाजपवर थेट निशाणा साधला. सध्या भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाल्यानेच राष्ट्रवादीने ही टोकाची भूमिका घेतल्याचा अंदाज व्यक्त केला
जातो.
पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत बोलताना पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली, तर चौकशीच्या फेऱ्यात सापडलेले छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनीही भाजपवर तोंडसुख घेतले. आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीसाठी आतापासूनच कामाला लागल्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
सध्या देशात भाजपच्या विरोधात वातावरण आहे, म्हणूनच राष्ट्रप्रेमी आणि देशद्रोही असे मुद्दे भाजपने उकरून काढल्याचा आरोपही पवार यांनी केला. सत्ताधारी भाजपकडून सुडाचे राजकारण सुरू झाले असून, विरोधी विचारांच्या नेत्यांना संपविण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. सत्ता येते वा जाते, पण पाय जमिनीवर ठेवायचे असतात. सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेल्याची टीकाही पवार यांनी केली.
गोमातेच्या नावाने भाजप राजकारण करते, पण त्याच गोमातेला चारा देण्याचे बंद केले जाते, असे सांगत चारा छावण्या बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल पवार यांनी संतप्त भावना व्यक्त केली. ‘मेक इन इंडिया’मधील गुंतवणुकीचे आकडे फुगवून सांगण्यात येत आहेत. राज्यात एकीकडे मोठय़ा प्रमाणावर कारखाने बंद होत आहेत आणि दुसरीकडे गुंतवणुकीचे गुळमुळीत चित्र उभे केले जात आहे.
जास्त गुंतवणूक ही मुंबई आणि कोकणात होणार आहे. मुख्यमंत्री विदर्भाचे असताना विदर्भात जास्त गुंतवणूक का झाली नाही, असा सवालही त्यांनी केला.
ठाणे आणि लातूरमध्ये सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनच पोलिसांना मारहाण करण्यात आली. हे कसले द्योतक आहे, अशी विचारणाही त्यांनी केली.

‘सूडबुद्धीने नगरसेवकांना गोवले’
ठाण्यात परमार बिल्डरच्या चुकीच्या गोष्टींवर आमच्या पक्षाच्या नगरसेवकांनी बोट ठेवले म्हणून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. लोकप्रतिनिधींनी चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणायच्या नाहीत का, असा सवालही पवार यांनी केला. परमार प्रकरणात भाजपने सुडाचे राजकारण केल्याचा सूर त्यांनी लावला होता.

वादाला खतपाणी
हैदराबादमधील रोहित वेमुल्ला आत्महत्या प्रकरण किंवा दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील गोंधळ यावरूनही पवार यांनी भाजपवर टीका केली. केंद्रातील भाजपच्या मंत्र्याने पत्र लिहिल्यानेच रोहितला हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आले होते, याकडेही लक्ष वेधले. आपल्या राजकीय स्वार्थाकरिताच भाजपकडून हिंदू विरुद्ध मुस्लीम, दलित विरुद्ध सवर्ण अशा वादांना खतपाणी घातले जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला.