छगन भुजबळ यांच्या चौकशीसंदर्भात सध्या काही बोलणार नाही, असे सांगणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोनच दिवसांत घुमजाव करीत भुजबळ यांची पाठराखण करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारभारवर टीका केली. गृह मंत्रालयाचे कामकाज कसे चालते, याची मला माहिती आहे. एखाद्या प्रकरणाचा तपास सुरू असताना माध्यमांना किती माहिती द्यायची, यावर काही बंधने असतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी केवळ प्रसिद्धीसाठी माध्यमांना चुकीची माहिती देत आहेत, असा थेट आरोप शरद पवार यांनी केला.

त्याचबरोबर मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय हे सरकारचे निर्णय असतात. त्यासाठी एकट्या भुजबळांना जबाबदार धरता येणार नाही, असे सांगत त्यांनी भुजबळांची पाठराखण केली. चौकशीमध्ये कोणताही हस्तक्षेप न करता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भुजबळांना आवश्यक ती सर्व मदत करेल, असेही आश्वासन त्यांनी दिले.


छगन भुजबळ यांनी गुरुवारी सकाळी मुंबईमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी विजय मिळवल्याने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपण त्यांना भेटलो, असे भुजबळ यांनी सांगितले. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, या भेटीनंतरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने ‘ट्विटर’च्या माध्यमातून भुजबळांच्या चौकशीसंदर्भात शरद पवार यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध केली आहे.