“ही लढाई सोपी नाही. कारण, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल व शेतकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही. आपण पाहत आहात, ६० दिवस झाले उन्हातान्हात थंडी वाऱ्याचा विचार न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी कधी त्यांची चौकशी केली का?” असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आता संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी देखील एकवटले आहेत. आज(सोमवार) मुंबईतील आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने राज्यभरातील शेतकरी आंदोलनासाठी एकत्र आले आहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संबोधित करत होते.

पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? शरद पवारांचा सवाल

यावेळी शरद पवार यांनी, आंदोलन करणारा शेतकरी आह पंजाब व हरियणाचा असल्याचं सरकारकडून सांगितलं जातं. पंजाबचा शेतकरी असला म्हणून काय झालं? पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का? असा संतप्त सवाल देखील केला. तसेच, चर्चा न करता कायदा आणले गेले. संसदेत जेव्हा कायदा आणला तेव्हा एका दिवसात एका अधिवेशनात एकदम तीन कायदे मान्य झाले. कायदा आणताना सविस्तर चर्चा झाली पाहिजे, असं देखील पवार म्हणाले.

तसेच, जो शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करतो, त्याला समाजकारणातून उध्वस्त करण्याची ताकद आमच्या आहे, हे तुम्ही आज या ठिकाणी दाखवून दिलं आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचा मी अभिनंदन करतो. असं शरद पवार उपस्थित आंदोलक शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले.

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरले फॅशन स्ट्रीटवरील दुकानदार; आझाद मैदानातील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दुकान बंद आंदोलन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, सुनील केदार, भाकपचे नेते कॉम्रेड नरसय्या आडाम, मुंबई काँग्रेस प्रमुख भाई जगताप, अबू आझमी यांच्यासह महाविकासआघाडी व शेतकरी संघटनांमधील अनेक नेत्यांची देखील यावेळी उपस्थिती होती.

यावेळी आंदोलक शेतकऱ्यांकडून “कोण म्हणतं देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही…”, “जय किसान, जय जवान…” अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली.

अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांचा हा महामोर्चा आज राजभवनावर देखील धडकणार आहे. या ठिकाणी शेतकरी संघटनांकडून राज्यपालांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. आझाद मैदाना तीन दिवस शेतकरी धरणे आंदोलन करणार आहेत. यासाठी राज्यभरातून हजारो शेतकरी आले असल्याने, आझाद मैदान परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.