राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असूनही सरकारने अजूनही हा प्रश्न गांभीर्याने घेतलेला नाही. परतीचा पाऊस पडला नाही तेव्हाच दुष्काळ जाहीर व्हायला हवा होता. मात्र सरकारने विलंब केला. आताही लोकांना मदत मिळत नसून दुष्काळी उपाययोजनांमध्ये सरकार अपयशी ठरल्याचा ठपका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांनी भाजप सरकारवर ठेवला. दुष्काळ निवरणासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत आणि भरीव मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पक्षाचे नेते आणि आमदारांच्या बैठकीत दुष्काळाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली.  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दुष्काळ निवारणासाठी आघाडी सरकारच्या काळात केलेल्या उपाययोजना आणि आजच्या परिस्थितीत काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबतचे निवेदन देणार असल्याची माहिती पवार यांनी  दिली.

राज्य सरकारनेही दुष्काळाचा विषय व्यवस्थित हाताळलेला नसल्याची टीकाही त्यांनी केली. दुष्काळामुळे पिकांसोबतच फळबागांचे नुकसान झाले असून त्यांना हेक्टरी ३५ हजारपेक्षा अधिक मदत द्यावी, जनावरांच्या छावण्यांत एका शेतकऱ्याची पाचच जनावरे घेण्याची अट रद्द करावी आणि त्यांना वाढीव मदत द्यावी, टँकरने पाणीपुरवठा करताना पाण्याचा स्रोत आणि गाव यामधील अंतर लक्षात घेऊन टँकरची किंमत ठरवावी, पीक कर्जाची वसुली थांबवून कर्जाचे पुनर्गठन करावे, येत्या शैक्षणिक सत्रात मुलांचे शुल्क सरकारने भरावे आदी मागण्या राष्ट्रवादीने केल्या आहेत. पक्षातर्फेही दुष्काळी भागात मदतकार्य सुरू करण्यात येणार असून सहकारी संस्था आणि उद्योजकांनी सामायिक दायित्व निधीतून फंडातून मदत द्यावी, असे आवाहन केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवडणूक खर्चाच्या हिशेबावरून पवार यांनी  पाठराखण केली. आणीबाणीनंतर निवडणुकीदरम्यान  पु.ल. देशपांडे यांनी राज्यभर काँग्रेसविरोधात प्रचार सभा घेतल्या होत्या. त्यावेळी आयोगाने हिशेब मागितला नव्हता. सभा घेण्याचा सर्वानाच अधिकार आहे. त्यामुळे सभांच्या खर्चाचा हिशेब मागण्याचा आयोगाला काय अधिकार, असा सवाल पवार यांनी केला.

‘नक्षलवादी हल्ल्यास मुख्यमंत्रीच जबाबदार’

गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्याचा प्रकार चिंताजनक आहे. विदर्भातील असूनही मुख्यमंत्र्यांनी या समस्येकडे लक्ष दिलेले नाही. केवळ नक्षलवादी हल्यानंतरच शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते या भागात जातात. विकास होत नसल्याने लोकांमध्ये नाराजी असून त्याचा फायदा उठवत नक्षलवाद्यांनी गेल्या काही दिवसांत १८ ते १९ हल्ले  घडविले असून गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यास मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याचा आरोप  शरद पवार यांनी केला.  आपण मुख्यमंत्री असताना गडचिरोली-चंद्रपूर भागात नक्षलवादाची सुरुवात झाली होती. आम्ही त्याकडे केवळ कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न म्हणून पाहिले नाही, तर विकासापासून वंचित राहिलेल्या या परिसराला विकासात कसे आणता येईल या दृष्टीने लक्ष दिले होते. मात्र सध्याच्या सरकारने या भागातील विकासाकडे दुर्लक्ष केल्याची टीका पवारांनी केली.