पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्याबद्दलही भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जबाबादारी आहे, पण इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेत, असं आवाहन पवार यांनी केलं. दरम्यान यावरुन राजकारन पहायला मिळत आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

आमदार अतुल भातखळकर यांनी दोन बातम्या ट्वीट केल्या आहेत. एका बातमीमध्ये पूरग्रस्त भागातील दौरे नेत्यांनी टाळा, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे. तर दुसरी बातमी आमदार रोहित पवार पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज कऱ्हाडमध्ये जाणार असल्याची आहे. या दोन बातम्यांचा संदर्भ घेत अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. “जाणते पवार आज बोलतात, उद्या कोलांटी मारतात. त्यामुळे बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत” असे भातखळकर म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार यांची काल (मंगळवार) मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी पवार यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातील पूरपरिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं. “राज्याला पुराचा मोठा फटका बसला. पुरामुळे घरांचं व शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. राज्यात सात आठ जिल्यात पूरस्थिती आहे. कोकणात घरांचं नुकसान झालंय. इतर ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. सहा जिल्ह्यांमध्ये अधिक नुकसान झालं आहे”, असं पवार यांनी सांगितलं. पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात येणाऱ्या मदतीची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर पूरग्रस्त भागात डॉक्टरांची पथकं पाठवणार असल्याचंही ते म्हणाले. पुराचा फटका बसलेल्या १६ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वाटल्या जाणार असल्याचंही पवार म्हणाले.