राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. पवार यांनी मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पवार यांना आज रुग्णालयात दाखल करुन त्यांची एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र मंगळवारी रात्रीच पवार यांच्या पोटात जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्रीच पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पित्ताशयाचा खडा शस्त्रक्रिया करुन काढला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

नक्की वाचा >> शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी; प्रकृती स्थिर असल्याची आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

सोमवारी पहिल्यांदाच शरद पवार यांना गॉल ब्लँडरचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी पवारांना बुधवारी रुग्णालयात दाखल करुन शस्त्रक्रिया करण्याचं ठरवण्यात आलेलं. मात्र अधिक त्रास जाणवू लागल्याने मंगळवारी रात्री उशीरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या पित्ताशयातील खडा यशस्वीपणे बाहेर काढण्यात आला असून पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलीय.

या शस्त्रक्रियेसंदर्भातील ब्रीच कँडीमधील डॉक्टर अमित मायदेव यांनीही एएनआयशी बोलताना सविस्तर माहिती दिली. “काही चाचण्या केल्यानंतर आम्ही त्यांच्यावर आजच (मंगळवारी) रात्री शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. काही कॉम्पलिकेशन्स निर्माण झाल्याने आम्ही लगेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पित्तशय काढायचे की नाही याचा निर्णय आम्ही नंतर घेणार आहोत. सध्या ते देखरेखीखाली आहेत,” असं डॉक्टर मायदेव यांनी सांगितलं आहे.

पित्ताशयातील खडे कसे निर्माण होतात?

पोटात वरच्या बाजूला उजवीकडे आणि डावीकडे उजवीकडून डावीकडे यकृत असते. यकृतामध्ये खालच्या बाजूस पित्ताशयाची छोटी पिशवी असते. यकृतात पित्तरस तयार होतो आणि जास्त तयार झालेला पित्तरस पित्ताशयात साठवला जातो. आहार घेतल्यावर अन्न जठरात येते. तिथे ते तीन तास राहते. त्यानंतर अन्न लहान आतड्यात येते. यावेळेस पित्ताशयाच्या नलिकेमधून ठरावीक प्रमाणामध्ये पित्तरस पचनक्रियेसाठी लहान आतड्यात सोडला जातो. त्या योगे लहान आतड्यांमध्ये आहारातून आलेल्या स्निग्ध पदार्थाचे पचन होण्यास मदत होते. आता आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण सातत्याने जास्त झाले किंवा तंतुमय पदार्थाचे (फायबर) प्रमाण कमी झाले तर पित्तरस दाट बनत जातो आणि पित्ताशयात छोटे खडे तयार होतात.

पवारांचे दौरे रद्द…

देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू असून या पार्श्वभूमीवर शरद पवार केरळ आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार होते. मात्र, पोटाच्या त्रासामुळे त्यांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत.