News Flash

शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी रुग्णालयामधूनच पोस्ट केला ‘हा’ फोटो

बुधवारऐवजी मंगळवारी रात्रीच पवारांवर ब्रीच कँडीमध्ये करण्यात आली शस्त्रक्रिया

(फोटो सौजन्य: Twitter/supriya_sule वरुन साभार)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी येथे शरद पवार यांच्यावर एंडोस्कोपीनंतर मंगळवारी रात्रीच शस्त्रक्रिया करण्यात आली. पवारांना पोटदुखीचा जास्त त्रास होऊ लागल्याने आणि काही मेडिकल कॉम्पलिकेशन्स निर्माण झाल्याने शस्त्रक्रिया बुधावारी करण्याऐवजी मंगळवारी रात्रीच करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मंगळवारी रात्रीच पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पित्ताशयाचा खडा शस्त्रक्रिया करुन काढला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान ब्रीच कँडीमध्ये पवारांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे.

नक्की वाचा >> शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी; प्रकृती स्थिर असल्याची आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

पहाटे साडेपाचच्या सुमारस केलेल्या या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयातील एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व शरद पवार यांचे पुतणे अजित पवार तसेच जामखेडचे आमदार व पवारांचे नातू रोहित पवारही दिसत आहेत. पवार कुटुंबियांसोबत शरद पवारांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या टीममधील डॉक्टर्सही दिसत आहेत. “डॉ. मायदेव. डॉ. गोलवाला, डॉ. प्रधान, डॉ. दफ्तरे, डॉ. समदानी, डॉ. तिबरीवाला आणि ब्रीच कँडी रुग्णालयातील संपूर्ण टीमचे आभार,” अशी कॅप्शन या फोटोला सुप्रिया यांनी दिली आहे. फोटोमध्ये सर्वचजण मास्क घालून दिसत आहेत.

सोमवारी पहिल्यांदाच शरद पवार यांना गॉल ब्लँडरचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी पवारांना बुधवारी रुग्णालयात दाखल करुन शस्त्रक्रिया करण्याचं ठरवण्यात आलेलं. मात्र अधिक त्रास जाणवू लागल्याने मंगळवारी रात्री उशीरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या पित्ताशयातील खडा यशस्वीपणे बाहेर काढण्यात आला असून पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलीय.

या शस्त्रक्रियेसंदर्भातील ब्रीच कँडीमधील डॉक्टर अमित मायदेव यांनीही एएनआयशी बोलताना सविस्तर माहिती दिली. “काही चाचण्या केल्यानंतर आम्ही त्यांच्यावर आजच (मंगळवारी) रात्री शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. काही कॉम्पलिकेशन्स निर्माण झाल्याने आम्ही लगेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पित्तशय काढायचे की नाही याचा निर्णय आम्ही नंतर घेणार आहोत. सध्या ते देखरेखीखाली आहेत,” असं डॉक्टर मायदेव यांनी सांगितलं आहे.

पित्ताशयातील खडे कसे निर्माण होतात?

पोटात वरच्या बाजूला उजवीकडे आणि डावीकडे उजवीकडून डावीकडे यकृत असते. यकृतामध्ये खालच्या बाजूस पित्ताशयाची छोटी पिशवी असते. यकृतात पित्तरस तयार होतो आणि जास्त तयार झालेला पित्तरस पित्ताशयात साठवला जातो. आहार घेतल्यावर अन्न जठरात येते. तिथे ते तीन तास राहते. त्यानंतर अन्न लहान आतड्यात येते. यावेळेस पित्ताशयाच्या नलिकेमधून ठरावीक प्रमाणामध्ये पित्तरस पचनक्रियेसाठी लहान आतड्यात सोडला जातो. त्या योगे लहान आतड्यांमध्ये आहारातून आलेल्या स्निग्ध पदार्थाचे पचन होण्यास मदत होते. आता आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण सातत्याने जास्त झाले किंवा तंतुमय पदार्थाचे (फायबर) प्रमाण कमी झाले तर पित्तरस दाट बनत जातो आणि पित्ताशयात छोटे खडे तयार होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 8:27 am

Web Title: sharad pawar gallbladder operation supriya sule posted a photo with team of doctors scsg 91
Next Stories
1 शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी; प्रकृती स्थिर असल्याची आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती
2 मुंबईतील ४० लाख नागरिकांचे उद्यापासून लसीकरण
3 ‘एमआयडीसी’च्या संगणकीय प्रणालीवर सायबर हल्ला
Just Now!
X