03 June 2020

News Flash

मोर्चेकऱ्यांचा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा- शरद पवार

नव्या पिढीच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी योग्य पावले टाकली जातील

शरद पवार (संग्रहित छायाचित्र)

मराठा समाजाच्या निर्णायक मोर्चाच्या यशस्वी सांगतेनंतर परतीच्या वाटेवर असलेल्या मोर्चेकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रार्थना केली आहे. मोर्चेकऱ्यांचा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा, ही सदिच्छा, असं ट्विट त्यांनी केलं आहे. मराठा समाजाच्या मागण्यांच्यादृष्टीने निर्णायक समजल्या जाणाऱ्या मोर्चाला आज सकाळी ११ वाजता जिजामाता उद्यानापासून सुरूवात झाली. तब्बल पाच मैलांचे अंतर पार करून हा मोर्चा दुपारी एकच्या सुमारास आझाद मैदानात दाखल झाला. त्यानंतर या ठिकाणी भाषणाचा नियोजित कार्यक्रम पार पडला. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाष्य केले. आज मुंबईमध्ये मराठा मोर्चा हा अत्यंत शांततेने होत आहे आणि आपली भूमिका मोर्चेकरी शासनाकडे मांडतील याचा मला विश्वास आहे. या सर्वसमावेशक प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नव्या पिढीच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी योग्य पावले टाकली जातील, अशी माझी सरकारकडून अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मराठा क्रांती मोर्चा यशस्वी होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी मोर्चेकऱ्यांना शुभेच्छाही दिल्या. तसेच राज्यभरातून मुंबईत आलेल्या मोर्चेकऱ्यांचा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी आरक्षण व इतर मागण्यांचे निवेदन घेऊन आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चा समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर विधानसभेत विविध घोषणा केल्या. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणांवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असमाधान व्यक्त करत आपली नाराजी दर्शवली. सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. एकीकडे सर्व विरोधक असमाधानी असतानाच दुसरीकडे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2017 6:07 pm

Web Title: sharad pawar greet maratha kranti morcha protest in mumbai
Next Stories
1 मराठा क्रांती मोर्चा : मुख्यमंत्र्यांच्या उत्तराचे राणेंकडून स्वागत, विरोधकांच्या भुवया उंचावल्या !
2 मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी प्रा. धीरेन पटेल
3 मराठा समाजाला ओबीसींप्रमाणेच शैक्षणिक सवलती; मुख्यमंत्र्यांची घोषणा
Just Now!
X