News Flash

शिक्षण संस्था असल्याचे भासवून भूखंड लाटला!

वांद्रे-कुर्ला संकुलातील मोक्याच्या ठिकाणी असलेला सुमारे १३ एकर इतका मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या मालकीचा भूखंड मुंबई क्रिकेट असोसिएशन ही शैक्षणिक संस्था असल्याचे भासवून नाममात्र दरात

| August 20, 2015 02:04 am

शरद पवार जिमखाना, बीकेसी
वांद्रे-कुर्ला संकुलातील मोक्याच्या ठिकाणी असलेला सुमारे १३ एकर इतका मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या मालकीचा भूखंड मुंबई क्रिकेट असोसिएशन ही शैक्षणिक संस्था असल्याचे भासवून नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. होतकरू क्रिकेटपटूंसाठी कुठलेही शैक्षणिक कार्यक्रम न राबविणाऱ्या असोसिएशनने अटींचा भंग करून सर्रास व्यापारी वापर सुरू केल्यामुळे एमएमआरडीएने नोटीस बजावली होती; परंतु राष्ट्रवादी पार्टीचे नेते शरद पवार यांचाच थेट संबंध असल्यामुळे अशा नोटिशींना असोसिएशनने भीकही घातली नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशन रिक्रिएशन सेंटर म्हणून भूखंड मिळवून आता तर थेट ‘शरद पवार जिमखाना’ असे नामकरणच करण्यात आले आहे.
एमएमआरडीएने २००४ मध्ये हा १३ एकर भूखंड ८० वर्षांच्या भाडेपट्टय़ावर मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिला. यासाठी फक्तदोन कोटी ६५ लाख रुपये आकारण्यात आले.
याआधी हा भूखंड मे. अमृत मंथन धर्मादाय संस्थेने हेल्थ क्लबसाठी २००० मध्ये मागितला तेव्हा निविदा न मागविता असे भूखंड सवलतीच्या दराने देता येत नाही, असे कळविण्यात आले होते. तसेच हा विशिष्ट भूखंड शैक्षणिक संस्थांसाठी राखीव असल्याची बाब पुढे करण्यात आली होती; परंतु शरद पवार यांच्यासारख्या वजनदार राजकीय नेत्याने मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीएने १०० व्या बैठकीत ती मागणी तातडीने मंजूरही केली. निविदा मागविण्याची अटही शिथिल करण्यात आली.
या भूखंडाबाबत झालेल्या करारानुसार २३ टक्के वापर जलतरण तलाव, टेनिस कोर्ट, क्रिकेट नेट तसेच तत्सम क्रीडा प्रकारांसाठी वापरताना उर्वरित ६७ टक्के भूखंड लोकांच्या वापरासाठी मुक्त ठेवावा, अशी प्रमुख अट आहे; परंतु सदस्य वगळता कुणालाही या भूखंडावर येण्याची परवानगी नाही. अर्थात सदस्यशुल्क सामान्यांना न परवडणारे आहे.
या भूखंडावर एमएमआरडीएने १.५ इतके चटई क्षेत्रफळ दिल्यामुळे एकूण भूखंडाच्या १५ टक्के म्हणजे सुमारे दोन एकर इतक्या चटई क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यास मिळालेल्या सवलतीचा वापर यथेच्छ करण्यात आला आहे. १५ लाख रुपये आकारून सदस्यत्व देऊन सर्रास व्यापारी वापर सुरू आहे.
एमएमआरडीएबरोबर झालेल्या करारात व्यापारी वापर करता येणार नाही, असे स्पष्ट नमूद आहे; परंतु ही बाब बासनात गुंडाळून मुंबई क्रिकेट असोसिएशनने मे. शिर्के इन्फ्रास्ट्रक्चर्स यांच्याशी व्यापारी करारच केला आहे.
याची कुणकुण लागताच एमएमआरडीएने कागदोपत्री तरी नोटीस बजावून हा करार तीन महिन्यांत रद्द करावा अन्यथा भाडेपट्टा करार रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. एमसीएला सवलतीच्या दराने भूखंड दिल्याने शासनाला १३ कोटींचे नुकसान झाल्याचे लेखापालांनीच आपल्या अहवालात नमूद केले आहे; परंतु थेट पवारांचाच संबंध असल्यामुळे कारवाई होण्याची सुतराम शक्यता नाही, असे स्थानिक रहिवाशीही बोलून दाखवितात.

शैक्षणिक संस्था सांगून हा भूखंड लाटलेला नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशन ही नामांकित संस्था आहे.  हा भूखंड रीतसर बंदिस्त क्रिकेट अकादमीसाठी घेण्यात आला आहे. मुंबईतील साडेतीनशेहून अधिक क्लबना मोफत सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. स्थानिक रहिवाशांना मोफत कुठलीही सुविधा उपलब्ध करून देता येणे शक्य नाही. ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यासाठी सदस्यत्वाच्या मार्गाने पैसे गोळा करण्याशिवाय पर्याय उरत नाही. चांगल्या सुविधा हव्या असतील तर ते सशुल्कच मिळू शकते.
पी. व्ही. शेट्टी, मानद सचिव, मुंबई क्रिकेट असोसिएशन

* भूखंड: १३ एकर; मालकी- एमएमआरडीए
* सदस्य शुल्क: १५ लाख (दोन वर्षांत तीन हप्त्यांत पैसे भरण्याची सुविधा)
* सुविधा: वेस्टर्न विलो, पॅव्हेलियन, ओरिएन्टल स्विंग अशी तीन रेस्तराँ, स्पिन हा बार, जिम-स्टीम सोना बाथ, मुव्ही रूम, जलतरण तलाव, १३४ जणांसाठी कार्ड गेम्स रूम.
* खेळ: बिलिअर्ड्स, बॅडमिंटन, स्क्वॉश, टेनिस, बिझिनेस सेंटर.
* निवास: २२ आलिशान खोल्या आणि सूट्स.
लग्नासाठी तसेच विविध कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या क्षमतेचे हॉल्स. मैदानही उपलब्ध.

* अटी: संपूर्ण भूखंडाचा व्यापारी वापर करण्यास मनाई; क्रिकेट अकादमी, जिम, वाचनालय, अकादमीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तसेच जेवणाची व्यवस्था, क्रिकेटवरील चित्रफिती पाहण्यासाठी सभागृह, बॅडमिंटन-स्क्व्ॉश कोर्ट. मुंबईसह राज्यातील विद्यार्थ्यांना अकादमीत प्रवेश देणे बंधनकारक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 2:04 am

Web Title: sharad pawar gymkhana use for business purpose
Next Stories
1 ढग पळाले, तापमान वाढले
2 परळ टर्मिनस प्रकल्प निविदा प्रक्रिया सुरू
3 इतिहासाचा अवमान नको!
Just Now!
X