राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना अचानक पोटात दुखू लागल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, शरद पवारांवर ३१ मार्च रोजी शस्त्रक्रिया होणार असल्याचं देखील समजत असल्यामुळे नेमकं पवारांना काय झालं आहे? याविषयी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. “शरद पवारांच्या प्रकृतीविषयी कालच सुप्रियाताईंकडून समजलं होतं, त्याविषयी माझी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा झाली होती. त्यांची प्रकृती थोडी नाजूक आहे”, असं संजय राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

८ ते १० दिवस विश्रांती आवश्यक

शरद पवारांना पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करून सांगितलं आहे. यानंतर सर्वच स्तरातून शरद पवारांसाठी चिंता व्यक्त केली जात असताना त्याविषयी संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. “कालपासून पवार साहेबांची तब्येत नरम आहे असं कळालं होतं. मुख्यमंत्र्यांना भेटलो तेव्हाही आम्ही त्याविषयी चर्चा केली. सकाळी सुप्रियाताईंकडून समजलं की त्यांची तब्येत थोडी नाजूक आहे. त्यांना ८ ते १० दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यांना लहानशी शस्त्रक्रिया देखील करावी लागणार आहे. आम्ही प्रार्थना करतोय की त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळो आणि आमच्यापेक्षा तरूण असलेले ते नेते पुन्हा आमच्यासोबत कामाला लागोत”, असं संजय राऊत म्हणाले.

शरद पवार यांच्यावर बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

पवारांचा केरळ-प. बंगाल दौरा रद्द

दरम्यान, आगामी केरळ आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार येत्या काही दिवसांमध्ये केरळ आणि पश्चिम बंगालचा दौरा करणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे हे दौरे रद्द झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. “त्यांचा केरळ आणि पश्चिम बंगाल दौरा रद्द झाल्याचं देखील मला सुप्रियाताईंकडून समजलं”, असं राऊत म्हणाले आहेत.