पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढविल्यास पक्षाने ही निवडणूक गांभीर्याने घेतल्याचा संदेश जाईल. यातूनच पवारांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह पक्षाच्या नेत्यांनी धरला आहे.

गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ आदी नेत्यांनी पवारांनी माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. माढय़ाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशीही पक्षाच्या नेत्यांनी चर्चा केली. त्यांनी पवार हे उमेदवार असल्यास आपली काहीच हरकत नाही हे स्पष्ट केले. त्यातूनच शुक्रवारी माढा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत पवारांचे नाव पुढे करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीची तयारी राष्ट्रवादीने केली आहे.  शरद पवार हे उमेदवार असल्यास त्याची चांगली प्रतिक्रिया उमटेल. यामुळेच पवारांकडे आग्रह धरण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘लोकसत्ता‘शी बोलताना सांगितले. नेत्यांच्या आग्रहाचा पवार विचार करतील, असा विश्वासही व्यक्त केला.

२०१४च्या निवडणुकीच्या आधी यापुढे थेट लोकांमधून लढणार नाही, असे पवारांनी जाहीर केले होते. तसेच लोकसभेऐवजी राज्यसभेत जाण्याचा मार्ग त्यांनी पत्करला होता. पक्षाच्या नेत्यांनी आग्रह धरला असला तरी पवारांनी लगेचच होकार दिलेला नाही. पवारांनी सर्व निवडणुकांमध्ये चांगल्या मताधिक्याने विजय मिळविले होते. नुसत्या विजयापेक्षा चांगले मताधिक्य पवारांसाठी महत्त्वाचे आहे.  मताधिक्य कमी असले तरी पवारांवर टीका होऊ शकते. हे सारे मुद्दे लक्षात घेऊनच पवार निर्णय घेतील.