दुसऱ्या क्रमांकासाठी कोण हाच प्रश्न

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली विधाने पाहता ते संभ्रमावस्थेत सापडल्याचे दिसते, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लगावला.

भाजप प्रदेश कार्यालयातील माध्यम केंद्राचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटवर हवाई हल्ल्याचा सल्ला आपणच दिला असे विधान शरद पवार यांनी केले. त्यानंतर माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे पवार म्हणाले. या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या विधानांबाबत प्रतिक्रिया विचारली असता, शरद पवार यांचे विधान मी ऐकलेले नाही. हवाई हल्ल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तानला एकटे पाडण्यात यश आले. साहजिकच या निर्णयांचे श्रेय मोदी-भाजप यांनाच मिळाल्याने नेमके काय करावे हे इतर पक्षातील नेत्यांना समजेनासे झाले आहे. अशाच संभ्रमावस्थेतून पवार यांना या विषयावर काय भूमिका घ्यावी हा प्रश्न पडला असावा, असा टोला फडणवीस यांनी लगावला. अर्थात पवार हे एक समंजस-परिपक्व नेते आहेत. त्यांच्या पक्षात काही अपरिपक्व नेते आहेत. पण आम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असेही फडणवीस म्हणाले.

भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर सुरू असलेल्या संयुक्त मेळाव्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी किरकोळ कुरबुरी सुरू असल्या तरी ते स्वाभाविक असते.

मुंबईतील पूल दुर्घटनेला जबाबदार लोकांवर कारवाई होणे आणि चुका दुरुस्त करण्यासाठी कार्यवाही करणे याला आमचे प्राधान्य होते. दोषारोप करणे नाही. त्यामुळे या दुर्घटनेनंतर सत्ताधारी शिवसेनेबाबत मौन बाळगले या टीकेत तथ्य नसल्याचेही फडणवीस म्हणाले.

देशात लोकसभा निवडणुकीत पहिला क्रमांक निश्चितपणे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचाच असेल हे चित्र स्पष्ट झाले आहे. आता फक्त दुसऱ्या क्रमांकावर कोण हाच प्रश्न असून २०१९ ची लोकसभा निवडणूक ही दुसऱ्या क्रमांकावर कोण यासाठी लढली जात असल्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.