शरद पवार यांची राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्ट

निवडणूक वर्षांत राजकीय आणि सामाजिक आघाडीवर बदलांचे वारे वाहणार आहे. अशा वेळी देशाच्या राजकीय पटलावर राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी लागेल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी दिल्लीत झालेल्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा देशाच्या सत्ताकरणात महत्त्वाचा पक्ष असेल, असे अधोरेखित केले. राष्ट्रवादी काँग्रेसला आता कात टाकावी लागणार आहे. लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घेऊन पक्षाचा जनाधार वाढवावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा काही मोठा पक्ष नसला तरी देशात एक शक्ती म्हणून पुढे यावे लागेल, असा सल्लाही पवार यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना दिला.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जातीयवादी शक्तींचा पराभव करणे, हे आम्हा सर्वाचे उद्दिष्ट आहे. या कामात आपणही काही तरी करावे, अशी आंतराष्ट्रीय समुदायाची आपल्याकडून अपेक्षा आहे. हे आव्हान आपण स्वीकारले आहे. देशातील नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन होणार नाही, अशा समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस बांधील असल्याचेही पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय पटलावर महत्त्वाची भूमिका बजवावी, अशी टिप्पणी करीत पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावर महत्त्व वाढले पाहिजे, असा संदेश दिला आहे. भाजपविरोधातील सर्व पक्षांना एकत्र आणण्यासाठी आपण चर्चा करणार असल्याचे सांगत पवार यांनी विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याची अप्रत्यक्षपणे इच्छा व्यक्त

केली. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार असून, पुढील तीन महिन्यांमध्ये जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नोटाबंदी आणि वस्तू व सेवा करामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. दोन वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती. महागाई नियंत्रणात होती. विकास दरही चांगला होता. पण मोदी सरकारच्या धोरणांमुळे आर्थिक आघाडीवर फटका बसल्याचे मतही पवार यांनी व्यक्त केले.

‘सनातन’वरून लक्ष विचलित करण्यासाठीच डाव्यांवर कारवाई

विविध दहशतवादी कारवायांवरून सनातन संस्था आणि अन्य तत्सम संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अटकेचे सत्र सध्या सुरू आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच नक्षलवादी समर्थक असल्याच्या आरोपांवरून डाव्या नेत्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्या काही जणांना मी ओळखतो. ते सारे डाव्या विचारांचे असले तरी नक्षलवादी आहेत, असे वाटत नाही. पकडण्यात आलेल्यांच्या नातेवाईकांशी मी चर्चा करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.