शरद पवार, ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव यांच्याकडून चाचपणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकेल, असे प्रभावी नेतृत्व नसल्याने छोटय़ा-मोठय़ा राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. त्यात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आदी नेत्यांचा समावेश आहे.

बिगरभाजप आणि बिगरकाँग्रेस अशी आघाडी स्थापन करण्याच्या उद्देशाने के. चंद्रशेखर राव यांनी सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी तिसरी आघाडी स्थापन करण्याचे सुतोवाच केले असून, सामुहिक नेतृत्व असेल, असे स्पष्ट केले आहे. तेलगू देशमचे नेते व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे. नायडू यांनीही तिसऱ्या आघाडीत सहभागी व्हावे, असे ममतादिदींचे प्रयत्न आहेत.

लोकसभेच्या २००९च्या निवडणुकीप्रमाणेच २०१९च्या निवडणुकीकरिता आपल्याला मध्यवर्ती भूमिका मिळावी या उद्देशाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे रिंगणात उतरले आहेत. पुढील निवडणुकीनंतर शरद पवार पंतप्रधान होतील, असे भाकित राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वीच व्यक्त केले आहे. अर्थात, स्वत: पवार यांनी याचा इन्कार केला असला तरी या निवडणुकीनंतर ही अखेरची संधी साधता येईल का, असा पवारांचा नक्कीच प्रयत्न राहील. पवार यांनी अद्याप पत्ते खुले केले नसले तरी त्यांच्या राजकीय चालीचा अंदाज साऱ्यांनाच उशिरा येतो.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत मर्यादा आहेत. त्यांचे नेतृत्व सर्व विरोधकांनी अद्याप मान्य केलेले नाही. मोदी यांना आव्हान देऊ शकेल, असे नेतृत्व नसल्याने साऱ्याच विरोधी नेत्यांनी आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांच्याशिवाय अन्य कोणत्याही नेत्याचे नेतृत्व मान्य करणार नाही. याच वेळी शरद पवार, ममता बॅनर्जी आदी प्रस्थापित नेते राहुल यांचे नेतृत्व स्वीकारण्याची शक्यता कमीच आहे. विरोधकांच्या ऐक्यासाठी शरद पवार हे नवी दिल्लीत सक्रिय झाल्याने काँग्रेस नेत्यांचे या घडामोडींकडे बारकाईने लक्ष आहे.