महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राज्य सरकारने सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत करावी असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. आजच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी कोल्हापूर आणि सांगली येथे अनुभवलेली परिस्थिती काय आहे हे देखील सांगितले. इतकेच नाही तर न भुतो न भविष्यती अशा महापुराच्या संकटातून सांगली, कोल्हापूरच्या ग्रामीण आणि शहरी जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत असंही त्यांनी सुचवलं आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातल्या कराडमध्ये महापुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. अनेकांची घरं वाहून गेली आहेत, शेती उद्धवस्त झाली आहे. शरद पवार यांनी स्वतः या भागांमध्ये जाऊन तिथला आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना येथील परिस्थिती काय आहे ते सांगितलं.

मुख्यमंत्र्यांसमोर शरद पवार यांनी मांडलेले मुद्दे

१) ऊसाच्या उंचीवर पाणी गेल्याने उस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक क्षेत्रातील उस कुजण्याची चिन्हं आहेत. कर्जमाफीचे धोरण सरकारने जाहीर केले आहे मात्र यात वाढ करण्यात यावी.

२) अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे, यात अनेक गोरगरीबांच्या घरांचाही समावेश आहे. अनेकांची घरे मातीची होती त्यांना आता शासनाकडून पक्की घरं बांधून मिळावीत अशीही विनंती शरद पवार यांनी केली आहे.

३) कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात पशूधन वाहून गेले आहे. यासंबंधीचा योग्य तो निर्णय घेण्यात यावा असेही पवार यांनी सुचवले आहे.

४) सातारा, सांगली, कोल्हापूर यांसह कोकण आणि पालघर या ठिकाणीही मोठं नुकसान झालं आहे. या सगळ्याची नुकसान भरपाई आचारसंहिता लागू करण्यापूर्वी दिली जावी या मागण्या करण्यात आल्या