प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा बडय़ा पक्षांचा डाव असल्याचा संशय व्यक्त करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात नवी मोर्चेबांधणी सुरू केली असून, भाजपविरोधाचा समान धागा असलेल्या शिवसेना, मनसेला सोबत घेऊन राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक पक्षांची नवी आघाडी बांधण्यासाठी पवार यांच्या जोरदार हालचाली सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळेल असा पवार यांचा निवडणूकपूर्व प्रचाराचा दावा असला, तरी प्रत्यक्षात राजकीय परिस्थितीचा कोणताच अंदाज सध्या शक्य नसल्याने, नवी समीकरणे जुळविण्यासाठी पवार यांनी आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. निवडणूक निकालानंतर भाजपला एकाकी पाडून राष्ट्रवादी काँग्रेस, सेना आणि मनसे यांची नवी आघाडी बांधण्यासाठी चाचपणी सुरू झाली असून, सेना-मनसे ऐक्याचा तोडगा घेऊन काही विश्वासूंमार्फत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याशी संपर्कही साधण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
भाजपने सेनेसोबत असलेली २५ वर्षांची युती तोडल्यानंतर शिवसेना अत्यंत आक्रमकपणे भाजपच्या विरोधात उभी राहिली आहे, तर राज ठाकरे यांनीही भाजपलाच लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचार सभांमध्ये पवार यांच्यावर टीका केल्याने, आता राष्ट्रवादीनेही आपल्या टीकेचा रोख काँग्रेसकडून भाजपवर केंद्रित केला आहे. त्यामुळे, भाजप हाच समान शत्रू असलेल्या तिघा पक्षांना एकत्र आणून निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवी आघाडी अस्तित्वात येऊ शकते, असा या सूत्रांचा होरा आहे. पवार आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध कौटुंबिक जिव्हाळ्याचे असून, भाजपसोबत युती असतानाही शिवसेनेने पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांच्या नावास अनुकूलता दर्शविली होती. अलीकडेच पुण्यात पत्रकारांशी बोलताना, शिवसेना एकाकी नाही, असे शरद पवार बोलून गेले होते. मात्र, राजकीय गुप्ततेसाठी हे वाक्य सावरून त्यांनी त्याचा संदर्भ स्वपक्षाशी जोडला असला तरी नव्या समीकरणांची नांदीच त्यांनी या वक्तव्यातून करून दिली होती, असे या सूत्रांचे म्हणणे आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना एकाकी पडली असती का, असा प्रश्न पवार यांना पुण्यातील पत्रकारांनी केला असता, कोण म्हणते शिवसेना एकाकी आहे, असा प्रतिप्रश्न करून पवार यांनी नव्या समीकरणांचे सूक्ष्म संकेत दिल्याचे मानले जात आहे.

गुजरात व मध्य प्रदेशातही शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे केवळ महाराष्ट्र सरकारवर टीका करण्याचा मोदींना अधिकारच नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा मोदींना कोणताही नतिक अधिकार नाही.
शरद पवार, अहमदपूर येथील सभेत

प्रचाराच्या तोफा
केंद्रीय मंत्रिमंडळाच्यारूपात भाजपने अफझलखानाची फौज महाराष्ट्रात उतरवली आहे. स्वराज्यावर चाल करून आलेला प्रत्येक जण आमचा शत्रू आहे. पण महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणाऱ्या या अफझलखानाच्या फौजेला मराठी माणूस कधीच थारा देणार नाही.
उद्धव ठाकरे,  
तुळजापूर येथील सभेत