शरद पवार यांची भाजपवर टीका

देशात जातीय अत्याचाराच्या घटना वाढत आहे, मागास व अल्पसंख्याक समाजाला दडपून टाकण्याचा प्रयत्न होत आहे, किंबहुना देशाचे संविधानच दुबळे करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. मात्र वाट्टेल ती किंमत मोजू, परंतु सत्ताधाऱ्यांचा हा डाव राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यशस्वी होऊ देणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिली.

मुंबईत शनिवारी राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबीर पार पडले. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. देशात जातीयवादी घटना वाढल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. देशात अनेक ठिकाणी अफवांवरून निरापराध लोकांच्या हत्या घडत आहेत. मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला दडपून टाकण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना बदलण्याचा किंबहुना ती उद्ध्वस्त करण्याचा सत्ताधारी वर्गाकडून प्रयत्न केला जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता वाट्टेल ती किंमत मोजून देशाचे संविधान दुबळे करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिली.

केंद्रातील भाजप सरकारच्या कारभारावर कोरडे ओढताना पवार म्हणाले की, रुपया घसरला, याचा अर्थ आपल्या देशाचा अर्थसंकल्प ढासळला आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या परदेश दौऱ्याच्या वेळी देशाचे प्रतिनिधित्व करण्याऐवजी विरोधी पक्षांवर टीका करण्यात धन्यता मानली. म्हणूनच काल संसदेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आम्ही तुमच्याबद्दल वाईट चिंतित नाही, आमच्या मनात कोणाबद्दलही आकस नाही, हेच पंतप्रधानांना दाखवून दिले, अशा शब्दांत पवार यांनी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांची घेतलेल्या गळाभेटीचे समर्थन केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा फौजिया खान, पक्षाचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, उपाध्यक्ष नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ आदी नेत्यांची भाषणे झाली.