शरद पवारांकडून मोदी सरकारचे कौतुक

केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. पहिल्यांदाच निर्यातीसाठी असे निर्णय घेण्यात आले. बांगलादेश, चीनमध्ये साखरेची चांगली मागणी असून तेथे निर्यात वाढावी म्हणून केंद्र सरकार पावले टाकत असून त्याचा साखर उद्योगाला चांगलाच फायदा होईल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केंद्र सरकारचे तोंडभरून कौतुक केले. इथेनॉलबाबत घेतलेल्या निर्णयाबाबतही पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले.

राज्य सहकारी साखर कारखाना संघाची शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक झाली.देशातील साखर उद्योगासमोरील अडचणी पाहता केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी यापूर्वी कधी मिळाले नाही असे आकर्षक पॅकेज दिले आहे. जागतिक बाजारपेठेतही साखर निर्यातीसाठी सध्याची स्थिती अनुकूल आहे. या परिस्थितीचा लाभ राज्यातील साखर कारखानदारांनी उठवून जास्तीतजास्त साखर निर्यात करावी, असे आवाहन पवार यांनी या वेळी केले.

केंद्राकडून साखर निर्यातीसाठी कारखानदारांना सुमारे पाच हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज मिळणार आहे. केंद्राने ५० लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील १८५ साखर कारखान्यांना १५.५८ लाख मेट्रिक टन कोटा देण्यात आला आहे. सरकारकडून निर्यातीसाठी प्रतिटन आठ हजार ३१० रुपये, तर कारखाने ते बंदरापर्यंत साखर वाहतुकीसाठी प्रतिटन दोन हजार ५०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

ऊस संकटात

राज्यात यंदा ऊस लागवडीचे क्षेत्र वाढल्याने साखरेचे जादा उत्पादन होण्याची शक्यता असली तरी परतीच्या पावसाने दिलेली ओढ आणि हुमणी रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.