उमाकांत देशपांडे

अजित पवार यांच्याबरोबर सत्तास्थापनेचे अमित शहा शिल्पकार; विरोधी पक्षनेत्यांकडून सत्तानाटय़ावर प्रथमच सविस्तर भाष्य

राज्यात २०१९ मध्ये सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच भाजप अध्यक्ष अमित शहांकडे प्रस्ताव देऊन चर्चा केली होती व नंतर निर्णय फिरविला. हे न पटल्याने अजित पवारांनी पुन्हा आम्हाला पाठिंबा देण्याची तयारी दाखविल्याने त्यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन आमचा शपथविधी झाला, असा गौप्यस्फोट करीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष अमित शहा हे या सत्तास्थापनेचे शिल्पकार होते,’ असे ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

त्यावेळी अनेकांनी पाठीत खंजीर खुपसल्याने राजकारणात टिकून राहण्यासाठी गनिमी कावा करावा लागला. त्यावेळी तो निर्णय मला पूर्णपणे पटला होता. पण आता त्याचा विचार करताना किंवा मागे वळून पाहताना तसे केले नसते, तर बरे झाले असते,असे वाटत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शरद पवार यांनी दोन वर्षांपूर्वीही भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव देऊन शहा यांच्याशी बोलणी केली होती. पण शिवसेनेला बरोबर ठेवूनच राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी होता येईल, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका घेतली होती. शिवसेनेला बरोबर ठेवून सत्तेत सहभागी होण्यास  पवार यांनी नकार दिला. सेनेला सोबत ठेवण्याचा आग्रह मोदी यांनी ठेवला होता. नाहीतर तेव्हाच भाजपबरोबर राष्ट्रवादीचे सरकार आले असते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेला बरोबर घेण्याचा पंतप्रधानांचा आग्रह

शरद पवार यांच्या दोन वर्षांपूर्वीच्या प्रस्तावाबाबत तपशील उलगडून सांगताना फडणवीस म्हणाले, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपला विजय मिळाल्यावर देशात भाजपची ताकद वाढल्याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसला झाली. त्यामुळे पवार यांनी अमित शहांकडे भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी शिवसेना सत्तेत असूनही सातत्याने भाजप नेतृत्वावर टीका करीत होती, युतीत शिवसेना सडली, अशी वक्तव्ये केली होती.  तरीही पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेला बरोबर ठेऊनच सत्तेत सहभागी होता येईल, असे सांगितल्याने पवार यांनी ते अमान्य केले. नाहीतर शिवसेनेला तेव्हाच सरकारबाहेर ठेवता आले असते, असे फडणवीस यांनी सांगितले.  अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात अनेक वर्षे आरोप करूनही त्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याची तयारी का दाखविली, असे विचारता फडणवीस म्हणाले, काँग्रेसला एकटे पाडण्याची ती खेळी होती.  सत्तेत सहभागी झाल्यावरही कोणतीही तडजोड केली जाणार नाही,  तपास थांबविले जाणार नाहीत, असे भाजपने पवार यांना स्पष्ट केले होते.

..अन् शरद पवार यांनी निर्णय फिरवला

शिवसेनेशी २०१९ मध्येही मुख्यमंत्री पदावरून बोलणी फिसकटली. अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले नसतानाही शिवसेना अशी वागली. त्यावेळीही शरद पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव देऊन शहा यांच्याशी बोलणी केली होती. माझी अजित पवार यांच्याशी चर्चा झाली होती. शिवसेनेशी जुळणार नाही, हे लक्षात आल्यावर आम्ही राष्ट्रवादी काँगेसशी बोलणी केली होती. पण शरद पवार यांनी निर्णय फिरविला. आम्ही आठ-नऊ दिवस वाट पाहिली. शरद पवारांचा निर्णय न पटल्याने, तीन पक्षांचे सरकार चालविणे राज्यहिताच्या दृष्टीने योग्य न वाटल्याने अजित पवार यांनी आम्हाला पुन्हा निरोप पाठवून आपल्या बरोबर आमदार असल्याचे सांगितले.  शहांशी बोलणे झाले. सारेकाही रात्री ठरले व सकाळी अजित पवारांना उपमुख्यमंत्री  पद देवून आमचा शपथविधी झाला.  शहा यांचा कायम आम्हाला पाठिंबा,असून या सत्तास्थापनेच्या निर्णयाचे शिल्पकार तेच असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.