शरद पवार आणि राज ठाकरे यांचा समान सूर

मराठी नाटक आशय आणि विषयाच्या बाबतीत कुठेच उणे नाही, पण  उत्तम संहितेसोबतच सादरीकरणातली भव्यताही मराठी नाटकात दिसली पाहिजे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी ९८व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मांडले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याला अनुमोदन दिले.

पवार म्हणाले की, जागतिक रंगभूमीवर जे बदल होत आहेत, तशा सुधारणा आपल्या नाटकात व्हाव्यात. ‘मुघल-ए-आझम’सारख्या भव्य नाटकाची पाच-साडेपाच हजार रुपयांची तिकिटे काढूनही प्रेक्षक नाटक पाहतात. तसे नाटक मराठी रंगभूमीवर सादर करू शकलो तर रंगभूमीला चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी नावीन्याचा ध्यास घ्यायला हवा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मराठी रंगभूमीच्या सद्य:स्थिती-गतीसंबंधी विवेचन करताना हाच मुद्दा अधोरेखित केला होता. नाटकाचे तिकीट दर वाढवले तरी चालतील पण नाटक मोठे करा, असा सल्ला त्यांनीही दिला. कालिदास नाटय़गृह संकुलात उभारलेल्या सुधा करमरकर रंगमंचावर  मावळते नाटय़संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांनी अध्यक्षपदाची शिंदेशाही पगडी घालून आणि अध्यक्षीय पदक कीर्ती शिलेदार यांच्या गळ्यात घालून अध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्याकडे सुपूर्द केली. ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक सतीश आळेकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले.

राज्याचे सांस्कृतिकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे  म्हणाले की, मुंबई ही केवळ औद्योगिक नगरीच नाही तर नाटय़नगरीही आहे. या संमेलनात लोककलांनाही व्यासपीठ आणि मानाचे पान देण्यात आले आहे.

विक्रमासाठी हे संमेलन सलग साठ तासांचे झालेले नाही, तर राज्यातील समस्त कलावंतांना सहभागी करून घेण्याच्या निकडीतून ते इतके प्रदीर्घ काळ होणार आहे, असे नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी स्पष्ट केले. परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनीही आपले विचार मांडले.

लोककला आणि महिला दुचाकीस्वारांच्या सहभागाने नाटय़दिंडी रंगतदार

लोककलावंतांचे सादरीकरण आणि दुचाकीस्वार महिला यांच्या सहभागाने  बुधवारी दुपारी मुलुंडच्या रस्त्यांवरून नाटय़दिंडी वाजतगाजत संमेलनस्थळी थडकली. मुलुंड पश्चिम येथील रेल्वे स्थानकासमोरून दिंडीची सुरुवात झाली. त्यानंतर महात्मा गांधी मार्ग, पाच रस्ता येथून कालिदास नाटय़गृह असा या नाटय़दिंडीचा मार्ग  होता. दिंडीची सुरुवात सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी पालखीतील नटराजाचे पूजनाने केली. यावेळी आमदार सरदार तारासिंग यांनीही हजेरी लावली होती.

या नाटय़दिंडीत एकूण १५-२० लोककला सादर करणाऱ्या चमूंचा समावेश होता. तसेच २० महिला दुचाकीस्वारही होत्या. मालणकरांचा कोंबडा हा दिंडीचे विशेष आकर्षण ठरला होता. या आत्रंगी कोंबडय़ाबरोबर सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही.या दिंडीत अभिनेता सुयश टिळक याने ढोल वाजवून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर अभिनेत्री ऋतुजा देशमुख, मधुरा वेलणकर आणि विनोदी अभिनेता समीर चौगुले यांनी फुगडी घालून दिंडीत भाग घेतला. फुलचंद टिळक यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही नाटय़िदडीत सहभागी होऊन स्वच्छतेचे धडे दिले.  या दिंडीत भारत गणेशपुरे, सुप्रिया पाठारे, पूर्वा गोखले, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, ऋतुजा देशमुख, मधुरा वेलणकर, शरद पोंक्षे, भरत जाधव, पंढरीनाथ कांबळे, समीर चौगुले, अंकुर वाडवे, नंदेश उमप, निर्मिती सावंत, विजू माने, राजेश भोसले, सागर कारंडे, मानसी जोशी, अनिता दाते, लीना भागवत, स्मिता तांबे, सुकन्या कुलकर्णी, शुभांगी सदावर्ते, डॉ. गिरीश ओक आदी कलाकार उपस्थित होते.

हयात कलाकाराला श्रद्धांजली!

नाटय़संमेलनस्थळी अनेक दिवंगत अभिनेते व अभिनेत्री यांना श्रद्धांजली वाहण्यात आली असून प्रियदर्शनी संकुलात त्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. मात्र संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक नट प्रसाद सावकार यांचेही छायाचित्र त्यात होते. सावकार हयात असताना त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रताप नाटय़ परिषदेने केला. सावकार हयात असल्याचे लक्षात आणून दिल्यावर घाईघाईने त्यांचे छायाचित्र हटविण्यात आले.