मुंबईत बंडखोराला भाजपची साथ लाभल्याने संभ्रम
भाजपबरोबरील वाढत्या जवळिकीबद्दल टीका होत असतानाच विधान परिषदेच्या मुंबई प्राधिकारी मतदारसंघात घातलेल्या गोंधळामुळे राष्ट्रवादीबद्दलचा संशय आणखीनच वाढला आहे. राष्ट्रवादीचा बंडखोर रिंगणात राहणे, त्याला भाजपचे लाभलेले पाठबळ, तर काँग्रेसबरोबर राहण्याची पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भूमिका यामुळे राष्ट्रवादीबद्दल एकूणच संभ्रम तयार झाला.
प्रसाद लाड हे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जवळचे मानले जातात. पक्ष सत्तेत असताना लाड यांचे नेतृत्वाने बरेच ‘लाड’ केले होते, असे बोलले जाते. नगरमध्ये काँग्रेसच्या बंडखोराने माघार घेतल्यावर मुंबईत लाड माघार घेतील, अशी अटकळ बांधली जात होती. पण लाड यांनी माघार घेतली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शब्दाबाहेर नसलेल्या लाड यांनी माघार घेतली नाही तेव्हाच काँग्रेसच्या गोटात संशय बळावला.

भाजप उमेदवाराने माघार घेतली तेव्हाच भाजप राष्ट्रवादीच्या बंडखोराला मतदान करणार हे स्पष्ट झाले होते. राष्ट्रवादीची मते मिळणार नाहीत हे लक्षात घेऊन काँग्रेसने मते मिळविण्यावर भर दिला होता. मात्र राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक काँग्रेसलाच मदत करतील, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शेवटच्या टप्प्यात जाहीर केले.
पाठिंब्याचे गौडबंगाल
एकीकडे राष्ट्रवादीचा बंडखोर रिंगणात राहतो आणि दुसरीकडे शरद पवार हे काँग्रेसलाच मते देण्याची भूमिका जाहीर करतात यावरून राष्ट्रवादीबद्दल संभ्रम निर्माण झाला. मावळ लोकसभा मतदारसंघ आणि विधान परिषदेच्या जळगाव प्राधिकारी मतदारसंघांमध्ये पक्षाने अधिकृत उमेदवाराला मदत न करता अन्य उमेदवाराला पाठबळ दिल्याची उदाहरणे आहेत. यामुळेच राष्ट्रवादीच्या एकूणच भूमिकेबद्दल काँग्रेसचे नेते शंका घेत आहेत.
नगरमध्ये आमच्या उमेदवाराने माघार घेतल्यावर मुंबईत राष्ट्रवादीच्या बंडखोराकडून माघारीची अपेक्षा होती, पण हा उमेदवार रिंगणात राहिला, अशी मार्मिक प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. लाड यांनी बंडखोरी केली असली तरी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी काँग्रेसलाच मतदान केल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
कधी काँग्रेस तर कधी भाजपला अनुकूल अशी भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीबद्दल संशयाचे वातावरण तयार होते. मुंबईतही पक्षाने हाच प्रयोग केल्याने काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेबद्दल शंका घेतली जात आहे. मात्र भाई जगताप विजयी होतील हा काँग्रेसला ठाम विश्वास आहे.