यूपीएविरोधात लाट नाही, पण सत्तेबाबत साशंक
पंतप्रधानपदासाठी मी उपलब्ध नाही
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणतीही लाट दिसत नाही, पण एकूणच चित्र अस्पष्ट असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी आणखी एक गुगली टाकला. यूपीए सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास आनंदच आहे, असे सूचक उद्गार काढत पवार यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या यशाबद्दल शुक्रवारी साशंकताच व्यक्त केली.
सध्या विविध जनमत चाचण्यांमध्ये काँग्रेसची पीछेहाट होत असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या वेळी यश मिळालेल्या सर्वच राज्यांमध्ये काँग्रेसच्या जागा कमी होतील, असा अंदाज बांधण्यात येत असतानाच शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्यानेही काँग्रेसच्या यशाबद्दल शंका व्यक्त केली. नवीन मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असतानाच आगामी निवडणुकीनंतर सत्तास्थापनेत प्रादेशिक पक्षांचे सहकार्य मोलाचे ठरेल, असेही मत पवार यांनी मांडले. देशाची आर्थिक प्रगती लक्षात घेता स्थिर सरकार आवश्यक आहे. नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचे चित्र भाजपने उभे केले असले तरी आपल्याला अशी कोणती लाट असल्याचे वाटत नाही, असे पवार यांनी सांगितले. गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळालेले यश लक्षात घेता अशी लाट राज्यात तरी दिसत नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली.
आम आदमी पार्टीचे अस्तित्व दिल्लीच्या बाहेर फारसे जाणवत नाही. आसाममध्ये १९८५च्या सुमारास सत्तेत आलेल्या पक्षाचे नेते नंतर राजकीय रंगावर कधी दिसले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
‘सरकार गतिमान झाले’
राष्ट्रवादीमुळे निर्णय घेण्यात अडथळे येतात असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले असले तरी राष्ट्रवादीकडून कोणत्याही व्यक्तीच्या हिताचे नव्हे तर जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आग्रह धरण्यात आला होता वा यापुढेही धरला जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठका आठवडय़ातून दोनदा घेतल्या जाणार आहेत. एकूणच सरकार गतिमान झालेले दिसते, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून मारला.

शरद पवार यांच्याकडे पंतप्रधानपद सोपविण्यात यावे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे नेते अबू आसिम आझमी यांनी केल्याकडे लक्ष वेधले असता ‘कोणी काहीही म्हणो, पण मी उपलब्ध नाही’, असे प्रतिपादन पवार यांनी केले. सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या पंतप्रधानपदाबद्दल सद््भाव व्यक्त केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. १९९१ मध्ये आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरलो तेव्हा नरसिंह राव व आपल्याला मिळालेल्या मतांमध्ये फारसा फरक नव्हता, असेही पवार यांनी सांगितले.