शरद पवार यांचा सरकारवर आरोप; तरुणांना नोटीस पाठविण्याचे प्रकरण

समाजमाध्यमातून सरकार विरोधात मते मांडणाऱ्या तरुणांची सरकार पोलिसांच्या माध्यमातून गळचेपी करीत असून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून नाहक त्रास दिला जात आहे. एका राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी आणि सध्या मुख्यमंत्री कार्यालयातील एका विशेष कार्य अधिकाऱ्याच्या माध्यमातून या गोष्टी केल्या जात असून पुरोगामी महाराष्ट्रात पोलिसांच्या माध्यमातून अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी दिला. याप्रकरणी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विचारणा करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावरून सरकारविरोधात बदनामीकारक आणि आक्षेपार्ह लिखाण केले जात असल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी निधी कामदार यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी काही तरुणांना चौकशीसाठी नोटिसा पाठविल्या होत्या. त्यानंतरही सायबर पोलिसांकडून वारंवार तरुणांना नोटिसा पाठवून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे त्रासलेल्या काही तरुणांनी शनिवारी शरद पवार यांची भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. त्या वेळी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

या युवकांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांशी बोलताना पवार यांनी राज्यात अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी सहन केली जाणार नाही असे ठणकावून सांगितले. समाजमाध्यमावर लिहिणारे तरुण कोणत्या राजकीय पक्ष किंवा विचारधारेचे नाहीत. या देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार असतानाही केवळ मत व्यक्त केल्याने तरुणांना त्रास दिला जात आहे. त्यांना पोलीस नोटिसा पाठविल्या जात आहेत. काही लोकांना समन्स काढून सायबर सेलमध्ये बोलवून गलिच्छ भाषेत दमदाटी केली जाते. दिवसभर थांबवून ठेवले जाते. दमदाटी केली जाते. एकाला तर दोन महिने कोठडीत डांबून ठेवण्यात आले. हा सगळा प्रकार गंभीर असून त्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तींकडून या गोष्टी केल्या जात आहेत. ही व्यक्ती यापूर्वी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होती. सरकारी अधिकारी असतानाही हे अधिकारी राजकीय पोस्ट कशा लिहितात. सुसंस्कृत असा लौकिक असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून असे असंस्कृत कार्य होत आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले. या तरुणांच्या पाठीशी राष्ट्रवादी ठामपणे उभी असून कायदेशीर सल्लागारांना सोबत घेऊन या तरुणांना पाठवलेल्या नोटिसा तपासून त्यांना मदत करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

‘शिवसेनेचे जशास तसे उत्तर’

मुंबई महापालिकेत मनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेने भाजपला दिलेल्या धक्क्याबद्दल बोलताना पवार म्हणाले, फोडाफोडीचे हे राजकारण फक्त शिवसेना करतेय अशातला भाग नाही. भाजपनेसुद्धा सगळीकडे हेच राजकारण केले. याआधी भाजपने पुणे, पिंपरी व अन्य ठिकाणी हेच केले. जे पेरलेय ते उगवलेय. शिवसेनेने जशास तसे उत्तर दिले आहे असे वाटत असल्याचे पवार म्हणाले.