राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राजकारण्यांप्रमाणेच उद्योग, क्रीडा, साहित्य या क्षेत्रांमधील दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले आहे.

शरद पवार यांचा उद्या वाढदिवस असून त्यानिमित्त सकाळी नऊ वाजल्यापासून मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शुभेच्छा स्वीकारण्याकरिता उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी नेहरू सेंटरमध्ये होणाऱ्या समारंभात गीतकार गुलझार, ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री सुलोचना, साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, उद्योपती राहुल बजाज, शास्त्रज्ञ विजय भटकर, चित्रपट अभिनेता नाना पाटेकर आणि दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. उद्याच्या समारंभाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्व नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.