२०१९ हे निवडणुकांचं वर्ष आहे, मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील तर त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होतील. अशात राजकीय समीकरणं आणि जुळवाजुळव होताना आपल्याला दिसतेच आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासोबत दिसत आहेत. राज यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नातही राष्ट्रवादीचे नेते आले होते. इतरही प्रमुख पक्षांचे नेते या लग्नात होते.

मात्र शरद पवारांची राज ठाकरेंनी घेतलेली मुलाखत असो, एकत्र केलेला विमान प्रवास असो किंवा काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळांनी घेतलेली राज ठाकरेंची भेट असो हे सगळे विषय चर्चेत आहेत. अशात या विषयावर पहिल्यांदाच शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांना राज ठाकरे राष्ट्रवादीसोबत येणार का? हा प्रश्न पत्रकारांनी विचारताच शरद पवार म्हटले की राज ठाकरे हे सध्या आमच्या पक्षातल्या नेत्यांसोबत दिसत आहेत. काही प्रश्नांवर आमच्या सोबतही दिसत आहेत. असं असलं तरीही ते येत्या निवडुकीत आमच्या सोबत रहातील असं वाटत नाही.

राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जवळीक वाढते आहे का? असे वाटत असतानाच शरद पवारांनी मात्र निवडणुकीपर्यंत राज ठाकरे आमच्यासोबत रहातील असे वाटत नाही असे म्हटले आहे. न्यूज १८ लोकमतने या संदर्भातले वृत्त दिले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. येत्या निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार नाही असा दावाच अहिर यांनी केला आहे. त्यामुळेच मुंबईतली कोणतीही जागा मनसेसाठी सोडण्याचा प्रश्नच येत नाही असंही अहिर यांनी म्हटलं आहे.

निवडणुका आल्यावर राजकीय समीकरणांची चर्चा चांगलीच रंगत जरी असली तरीही बऱ्याचदा या चर्चा पोकळ ठरतात. राज ठाकरे यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत असणे, त्यांच्या काही प्रश्नांना साथ देणे हे अनेकांच्या भुवया उंचावणारे असले तरीही वास्तव मात्र तसे नसते याचीच साक्ष शरद पवारांच्या वक्तव्याने दिली आहे.