विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे तिकीट कापण्यात आले आहे.

दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या दोन्ही नावांची घोषणा करण्यात आली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम हे उपस्थित होते.

शरद रणपिसे, संजय दत्त आणि माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे तीन आमदार निवृत्त होत आहेत. यातील रणपिसे यांना कायम ठेवण्यात आले आहे. तसेच वजाहत मिर्झा यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून विद्यमान आमदार अनिल परब आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे ११ आमदार निवृत्त होणार आहेत. २७ जुलै २०१८ रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. दि. १६ जुलैला निवडणूक होणार असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ जुलै तर ९ जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल.