शरद उपाध्ये यांचे प्रतिपादन
वक्तृत्व कला म्हणजे अभिनिवेश नाही लोकांपर्यंत पोहोचण्याचे सहज माध्यम आहे. लोकांवर प्रभाव टाकण्याची गरज नाही. तुम्ही लोकांचे होऊन बोलले पाहिजे. समोर बसलेले लोक आपल्या घरातले आपले आहेत. असे समजून बोलले पाहिजे. भाषणात निरिक्षण आणि समयसुचकता हवी. आपल्याकडे मोठी ग्रंथसंपदा आहे अशा ग्रंथांचा सातत्याने अभ्यास केला पाहिजे, असा सल्ला ‘राशीचक्र’ कार शरद उपाध्ये यांनी रविवारी येथे दिला.
‘लोकसत्ता वक्ता दशसहस्त्रेषु’ या कार्यक्रमात ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. या वेळी उपाध्ये यांनी उपस्थित स्पर्धक आणि श्रोत्यांसमोर बारा राशींच्या स्वभाववैशिष्ठय़ांची मैफल रंगविली.
किस्से व कोपखळ्या मारत उपस्थिताना त्यांनी अक्षरश: पोट धरून हसविले. ‘सिंह’ राशीच्या व्यक्तिच्या स्वभावदर्शनाचा किस्सा सांगताना उपाध्ये म्हणाले, सिंह राशीच्या व्यक्ती या मानी स्वभावाच्या असतात. सिंह रास असलेल्या एका नवरा व बायकोमध्ये वाद झाला. दुसऱ्या दिवशी नवऱ्याला गिर्यारोहणासाठी पहाटे चार वाजता घरातून बाहेर पडायचे होते. त्यासाठी त्याने बायकोच्या उशाखाली ‘मला चार वाजता उठविणे’ अशी चिठ्ठी लिहून ठेवली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता जाग आल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद सुरु झाला. मी तुला पहाटे चार वाजता उठवायला ल्सांगितले होते, मला का उठवले नाहीस, असे चिडलेला नवरा बायकोला म्हणाला. त्यावर बायकोही सिंह राशीचीच असल्याने तिने नवऱ्याला ‘पहाटे चार वाजता जागे केले होते’ अशी लिहिलेली चिठ्ठी पुढे केली. यावर सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.

शब्दांच्या अर्थाचेही वाचन करावे
वक्त्याने भाषणात चकचकीत शब्दफेक न करता शब्दांच्या अर्थाचे वाचन केले पाहजे आणि अर्थाचे वाचन तेव्हाच शक्य आहे, जेव्हा स्पर्धक स्वत: त्याचे विचार तयार करेल. एका भाषेत आपण विचार करू शकत नाही, पूर्वसुरींचे वजन खांद्यावर घेऊन विषय मांडण्यापेक्षा स्वत:च्या आतून आलेला विचार मांडला पाहिजे अशा शब्दांत अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी वक्तृत्त्व शैलीचे मर्म उलगडले. नव्या पिढीने इतिहासातले दाखले देण्यापेक्षा स्वत:च्या आतून आलेले विचार मांडावे, विचार मांडतानाही केवळ शब्दांच्या सजावटीत अडकू नये. एखाद्या वेळेस मला हे येत नाही, असे सांगायची ताकदही ठेवावी. कुठल्याही व्यासपीठाची पायरी चढण्यापूर्वी संपूर्ण तयारी असल्याशिवाय जाऊ नये, असेही कुलकर्णी म्हणाले. वक्तृत्त्व शैली निर्माण करण्यासाठ निरीक्षणात सातत्य ठेवावे असेही ते म्हणाले.

आवेश असू नये
वक्त्याने नटाच्या आवेशाने भाषण सादर करू नये. अभिनय आणि भाषण यांत गल्लत करू नये. भाषण म्हणजे स्वत:चे विचार लोकांर्यंत पोहोचवणे आहे. तर अभिनय करताना नट लेखकाचे विचार मांडत असतो. शैली आणि मांडणी महत्त्वाची आहे. बोलतानाही विरामचिन्हे योग्य ठिकाणी वापरायला हवीत. भाषणात संथ सूर असणे महत्त्वाचे आहे, असे मत चंद्रकांत कुलकर्णी यांनी मांडले. वक्तृत्त्वासाठी भाषेवर प्रभुत्व असलेच पाहिजे. परंतु त्याच सोबत हावभाव महत्त्वाचे असतात, असे ही कुलकर्णी म्हणाले. चुकीचे संदर्भ देण्याऐवजी एखादा संदर्भ आठवला नाही, तर तो वगळावा किंवा आठवत नाही, असे स्पष्ट सांगावे, असेही अखेरीस त्यांनी सांगितले.