भाजपतर्फे संभाव्य राजकीय विरोधकांना सध्या एकच संदेश दिला जातो. ‘तुम्ही आमच्याबरोबर या किंवा गप्प बसा. हे दोन्ही पर्याय मान्य नसले तर तुमच्या फायली आमच्या हाती आहेतच’, हा तो संदेश. आतापर्यंत असंख्य उदाहरणांतून भाजपने ही आपली कार्यशैली दाखवून दिली आहे. मग ते बिहारात लालू कुटुंबीयांविरोधातील कारवाई असो किंवा कर्नाटकी मंत्र्यांवरच्या धाडी वा चिदम्बरमपुत्रापाठोपाठ जयंती नटराजन यांच्या घरांवरील छापे. यातून भाजप प्रच्छन्नपणे हाच संदेश देते. सुनील तटकरे यांच्याविरोधातील कारवाईच्या वृत्तातूनही हेच ध्वनित होते. आम्ही देत आहोत ते मंत्रिपद घ्या अथवा तुमच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेतच, हा यामागचा अर्थ. तो खरा असल्याने भाजपला या भ्रष्टाचारांची ना प्रामाणिक चौकशी करावयाची आहे ना ती प्रकरणे बंद करावयाची आहेत. भाजपला रस आहे तो केवळ ही प्रकरणे टांगती ठेवण्यात. त्याचमुळे, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, काँग्रेस अशा सर्वच पक्षांना नकोशा झालेल्या छगन भुजबळ यांचे प्रकरण वगळता अन्य कोणतेही प्रकरण भाजप सरकारांकडून धसास लावले जात नाही. जाणारही नाही. नारायण राणे हेदेखील भाजपच्या वाटेवर आहेत ते याचमुळे. ते जाणतात की विरोधी पक्षांत राहून भाजपला विरोध तर करता येणारच नाही. उलट चौकशीचा ससेमिरा, छापे वगैरेंची शुक्लकाष्ठे मागे लागण्याचा धोका. त्यापेक्षा सांप्रती सत्तासूर्य तळपत असलेल्या भाजपच्या अंगणात जाऊन उभे राहिलेले बरे. बाकी काही मिळो न मिळो निदान ‘ड’ जीवनसत्त्व तरी मिळते. सुनील तटकरे, अजित पवार यांच्या चौकशीचे, सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद देऊ  केल्याचे वृत्त राजकारणात नव्याने विकसित झालेल्या ‘भ’ जीवनसत्त्वाचा परिचय करून देणारे आहे. या अग्रलेखावर ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. या आठवडय़ाकरिता ‘‘भ’ जीवनसत्त्व’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे. या लेखावर मत लिहणे सोपे व्हावे यासाठी ‘लोकसत्ता’चे राजकीय संपादक संतोष प्रधान आणि दिनेश गुणे यांना लिहिते केले. शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते.