देवनार कचराभूमीचा प्रश्न सोडवता येण्यासारखा असूनही तो सत्ताधारी व प्रशासनाकडून सुटत नाही यावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी हा प्रश्न सुटत नसल्याने, ‘मला मुंबईत राहण्याची लाज वाटते’, असे विधान केले. काकोडकर यांच्या सारख्यांना असे जाहिर विधान करावेसे वाटते यावरून देवनार प्रश्नासह देशातील अन्य समस्या या किती निंदनीय आहेत यावर ‘लोकसत्ता’च्या ‘माझ्या मना बन दगड’ अग्रलेखात (शनिवार, २३ एप्रिल) उपरोधिकपणे भूमिका मांडण्यात आली आहे. काकोडकरांसारख्या वरिष्ठांना अशा अजून किती घटनांची लाज वाटावी याचा समाचार या अग्रलेखात घेण्यात आला आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे. मुंबईतील देवनार कचराभूमी प्रश्नी डॉ. काकोडकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केल्यानंतर या देशात जन्माला येऊन लाज वाटून घेण्याची त्यांची संवेदना जिवंत आहे. मात्र, देशात देवनार सारखे अनेक प्रश्न कायम असून काकोडकरांनी अशी संवेदना ही कायमची मुळापासून खुडून टाकली तर त्यांच्यासारख्यांचे जगणे भारतात सुसह्य होऊ शकेल. देशातल्या गंभीर समस्या पाहून मन व्यथीत करून घेण्यापेक्षा मनावर दगड ठेवलेलाच बरा असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. हा सल्ला देण्यामागे, देशातील गंभीर समस्या सुटण्यासारख्या असूनही त्या न सोडविणारे प्रशासन व राज्यकर्ते यांच्यावर निशाणा साधण्याचा या अग्रलेखाचा हेतू आहे. याच अग्रलेखावर ब्लॉग बेंचर्समध्ये आपली भूमिका मांडायची आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. या विषयावर ‘लोकसत्ता’ने आयआयटी मुंबईतील पर्यावरणशास्त्र व अभियांत्रिकी केंद्रातील प्राध्यापक श्याम असोलेकर व ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अभिजीत ताम्हणे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना मत मांडतना उपयोग होणार आहे. हे लेख indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

लक्षात ठेवावे असे..
* प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते.
* मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत.
* indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers  या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.
* ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते.
* नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉगइन करून विद्यार्थ्यांना भूमीका मांडता येते.
* किमान २५० शब्द व मराठीतील लेखनाचाच स्पर्धेसाठी विचार केला जाईल. सहभागी होताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी ’‘loksatta.blogbenchers@expressindia.com  या ई-मेलवर संपर्क साधावा.