आंतरराष्ट्रीय दबावामुळे नवे बौद्धिक संपदा धोरण आखणे आपणास भाग पडले असले तरी त्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदनच केले पाहिजे. यापुढील काळात कल्पनेचे रक्षण करणे हे अधिकाधिक जिकीरीचे होत जाणार आहे. या बदलत्या आव्हानांसाठी कायदेही बदलणे गरजेचे होते. ती गरज या नव्या धोरणामुळे काही अंशी पूर्ण होणार आहे. तसेच उचापती वा जुगाड करून वेळ मारून नेणाऱ्यांना यामुळे आळा बसू शकणार आहे. या विषयावर भूमिका मांडणाऱ्या ‘जुगाड संस्कृतीचा अंत?’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.
बौद्धिक संपदेच्या मुद्दय़ावर जगातील प्रमुख ३८ देशांत भारत तूर्त ३७ व्या क्रमांकावर आहे. ही परिस्थिती खचितच भूषणावह नाही. ती बदलणे आवश्यक होते याची जाणीवही आपल्याला होती. परंतु आपले काही अडत नसल्यामुळे आपण सतत त्या गरजेकडे कानाडोळा करीत आलो. परिणामी उचलेगिरी आपल्याकडील राजमान्य उद्योग ठरला आहे. परंतु आता अगदीच गळ्याशी आल्याने बौद्धिक संपदेकडे नव्याने पाहण्याची वेळ देशावर आली आहे. याच मुद्दय़ांचा उहापोह ‘जुगाड संस्कृतीचा अंत?’ या अग्रलेखात करण्यात आला आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये आपली भूमिका मांडायची आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी हा लेख देण्यात आला आहे.

लक्षात ठेवावे असे..
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.