भारतासारख्या देशात गोरेपणा हा विशेष गुण मानला जातो त्यामुळे देशात आफ्रिकी नागरिकांवर केवळ त्यांच्या कातडीच्या रंगावरून हल्ले होणार असतील तर त्याचे आश्चर्य वाटायचे अजिबात कारण नाही. मासोंदा ओलिव्हिए या आफ्रिकी तरूणाची राजधानी दिल्लीत जमावाकडून हत्या झाली. नंतरच्या तपासात हा वर्णभेदाचा प्रकार नाही अशी सारवासारव होत असली तरी मासोंदाच्या त्वचेचा रंग काळा होता हे त्याला मारहाण करण्याचे कारण निश्चितच आहे. भारतातील वर्णभेदाचे हे वास्तव मांडणाऱ्या ‘काळे वास्तव’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये आपले मांडायचे आहे.
वर्ण वर्चस्ववाद भारतामध्येच होतो अशातला भाग नाही. विकसित देशांतही आफ्रिकींना अकारण अपमानास्पद वागणूक मिळते. परंतु आपण आणि हे विकसित देश यांतील फरक म्हणजे ते जे काही होते ते मान्य करतात आणि त्यास आपण तात्त्विक मुलामा देऊ पाहतो. दिल्लीतील प्रकरणातही तेच घडले. अनेक आफ्रिकी देशांनी भारतातील या वर्णभेदी घटनेवर टीका केली. त्यामुळे आता तरी भारतातील या प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा हवी. न पेक्षा आपले हे काळे वास्तव बदलणार नाही. याच मुद्दय़ांवर ‘काळे वास्तव’ या अग्रलेखात चर्चा करण्यात आली आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये आपली भूमिका मांडायची आहे. पुढच्या गुरूवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना मत मांडणे सोपे व्हावे यासाठी ‘लोकसत्ता’ने तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून समाजशास्त्राचे अभ्यासक राहूल बनसोडे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मताचा विद्यार्थ्यांना मत मांडताना उपयोग होणार आहे. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी हा लेख देण्यात आला आहे. अर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद आदी विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येकवेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला. या लेखन स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरूवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

लक्षात ठेवावे असे..
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.