समलिंगी संबंधांच्या संदर्भात सनातन्यांच्या बुरसटलेल्या भूमिकेवर तुटून पडणाऱ्या ‘लोकसत्ता’त ३ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘समलिंगी समानता’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.
समलिंगी संबंधांच्या संदर्भात लैंगिकतेसंबंधीच्या कायद्याचा पुनर्विचार करण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायमूर्तीचे खंडपीठ नेमण्याचे आदेश दिले आहेत. खरे तर २०१३ मध्ये या संदर्भात न्यायालयानेच विरोधातील भूमिका घेत लैंगिकतेसंदर्भातील जुन्या व मागास तरतुदींवर शिक्कामोर्तब केले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी या आपल्या भूमिकेचा नव्याने विचार करण्याची गरज व्यक्त करून न्यायालयाने देशभरातील समलिंगींना आशेचा किरण दाखविला. या निर्णयाचे स्वागत करणाऱ्या या अग्रलेखात लैंगिकतेविषयीच्या समाजाच्या दांभिकतेवर सडकून कोरडे ओढले आहेत. लोकानुनयी भूमिका घेणाऱ्या सरकारवरही कठोर टीका करणाऱ्या या अग्रलेखावर या आठवडय़ाच्या ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये विद्यार्थ्यांना भूमिका मांडायची आहे. तत्पूर्वी तृतीयपंथींच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या ‘सखी चारचौघी’ या सामाजिक संस्थेच्या संचालिका गौरी सावंत आणि ‘हमसफर ट्रस्ट’ या समलिंगींच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक रावकवी यांना ‘लोकसत्ता’ने बोलते केले आहे. या दोघांनीही या विषयाचा सामाजिक, मानसिक, शारीरिक अशा विविध दृष्टिकोनातून या संवेदनशील विषयाचा आढावा घेतला आहे.

लक्षात ठेवावे असे..
* या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे आहे.
* मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ.
indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.
* नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉगइन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते.
* ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते.
* किमान २५० शब्द व मराठीतील लेखनाचाच स्पध्रेसाठी विचार केला जाईल.
* सहभागी होताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.