असंख्य भारतीयांना ज्याची प्रतिक्षा होती ते अखेर घडले. भारतीय फौजांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. भारतीय कमांडो पथकांनी केलेल्या कारवाईमुळे सर्वाचीच छाती अभिमानाने भरून आली आहे. या कारवाईबद्दल भारतीय जवानांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मात्र पाकिस्तानप्रमाणेच भारतालाही युद्धाचा खेळ परवडणारा नाही आणि त्यातून काही साध्यही होणार नाही. त्यापेक्षा दहशतवादाविरोधात कारवाई करतानाच पाकिस्तानची मुलकी मार्गाने कोंडी करणे अधिक परिणामकारक ठरू शकते. मोदी आणि मंडळींना याची जाणीव वेळीच झाली असून, पाकव्याप्त काश्मीरात दडलेल्या दहशतवाद्यांना ठेचून काढतानाच युद्धाचे ढग निर्माण होणार नाहीत याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली आहे. शिवाय या सगळ्यातून मोदी सरकारच्या छातीचे मापही कायम राहिल्याची भावना भगतगणांत निर्माण झाली आहे. युद्धज्वरापेक्षा ते केव्हाही बरे. अशी स्पष्ट भूमिका आज प्रसिद्ध झालेल्या ‘छातीचे माप’ या अग्रलेखात मांडण्यात आली आहे.

या हल्ल्यामुळे देशातील युद्धज्वरग्रस्तांचे अधिकच तापणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. परंतु येथे एक गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे, की हे भारताने पाकिस्तानविरोधात पुकारलेले लष्करी युद्ध नाही. भगतगण आणि गणंगांचे याबाबतचे म्हणणे काहीही असले, तरी इतरांनी त्या लाटेत गटांगळ्या खाण्याचे कारण नाही. याची जाणीवही या अग्रलेखात करुन देण्यात आली आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

पुढच्या गुरूवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी हा लेख देण्यात आला आहे. अर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद आदी विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येकवेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला.

या लेखन स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरूवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यांच्या निर्भिड लेखणीला वाट करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विद्यापीठांची व महाविद्यालयांचीही मोलाची साथ लाभली आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.