‘खान’ आडनावामुळे आपल्याला देश-परदेशात किती त्रास सहन करावा लागतो, हे सांगण्याची एकही संधी न सोडणारा शाहरुख या ‘बीइंग खान’ नाम्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडला आहे.
एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखने ‘भारतातील मुस्लिमांसंदर्भात जे काही चुकीचे असेल त्याबद्दल टीकाटिप्पणी करताना राजकीय नेत्यांकडून विनाकारण मी त्या समाजाचा एकमेव प्रतिनिधी असल्यासारखे माझ्यावर तोंडसुख घेतले जाते’, असे विधान केले आहे. या विधानावरून पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी भारताने शाहरुखला सुरक्षा दिली पाहिजे, असे सांगत शहाजोगपणा केला. त्याला केंद्रीय गृहसचिवांनीही खरमरीत उत्तर दिले असले तरी या मुलाखतीवरून सुरू झालेल्या सुंदोपसुंदीमुळे शाहरुख पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. या पाश्र्वभूमीवर त्याने मंगळवारी त्यासंदर्भात प्रसिध्दीमाध्यमांकडे खुलासा केला.
पंधरवडय़ापूर्वी शाहरुखची सुरक्षाव्यवस्था पोलिसांनी काढून घेतल्याचे सांगितले जात होते. त्यातच उपरोक्त मुलाखतीत त्याने खान म्हणून आपल्याला मिळत असलेल्या वाईट वागणुकीबद्दल दु:ख व्यक्त केले. माझे वडील भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. तरीही माझ्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचे आरोप वेळोवेळी केले गेले. मी माझे येथील घर सोडून पाकिस्तानमध्ये जावे, या मागणीसाठी राजकीय नेत्यांनी मोर्चेही काढले,’ असे सांगणाऱ्या शाहरुखने आपण भारतीय असल्याचे दाखलेही या मुलाखतीत दिले आहेत. या ‘खाननाम्या’च्या थेट परिणामस्वरूप दोन देशांमध्ये वादाला तोंड फुटले असून पुन्हा एकदा चुकीच्या कारणामुळे शाहरुख खान वादात सापडला आहे.