व्यवस्थापन अभ्यासक्रमाची (एमबीए) प्रवेश परीक्षा गेली दहा वर्षे देणारे आणि दरवर्षी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणारे शशांक प्रभू यंदा पहिले आले आहेत. विद्यार्थी म्हणून २०१० मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांनी मिळवलेले गुण हे एमबीए सीईटीच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक गुण आहेत.

शशांक प्रभू डोंबिवलीत राहतात. ते व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत यंदा २०० पैकी १५९ गुण मिळवून पहिले आले आहेत. त्यांनी २०१० मध्ये व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी सीईटी दिली. त्या वेळी २०० पैकी १७९ गुण मिळवून ते राज्यात पहिले आले होते. एमबीए सीईटीच्या आजपर्यंतच्या इतिहासात १७९ गुण हे सर्वाधिक आहेत. त्या वेळी मुंबईतील कोणत्याही संस्थेत त्यांना सहज प्रवेश मिळाला असता, मात्र अधिक चांगली संस्था मिळावी म्हणून राष्ट्रीय प्रवेश परीक्षांबरोबरच २०११ मध्ये त्यांनी पुन्हा सीईटी दिली. त्या वेळीही ते पहिल्या दहा दहामध्ये आले आणि राष्ट्रीय प्रवेश परीक्षेतील उत्तम गुणांमुळे दिल्ली विद्यापीठाच्या व्यवस्थापन अभ्यासक्रम विभागात प्रवेश मिळाला. तेथून २०१३ मध्ये एमबीए पूर्ण केल्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या विविध प्रवेश परीक्षांबाबत मार्गदर्शन सुरू केले. तेव्हापासून विद्यार्थी म्हणून नाही, पण मार्गदर्शक म्हणून ते परीक्षा देत आहेत. २०१६ मध्येही १६५ गुण मिळवून ते राज्यात पहिले आले होते. ‘‘परीक्षेत काय बदल होत आहेत याचा अभ्यास करण्यासाठी मी परीक्षा देतो. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांची तयारी करून घेताना होतो. सीईटीबरोबरच कॅट आणि इतरही परीक्षा देतो. मात्र, मी परीक्षा दिल्यामुळे कुणाही विद्यार्थ्यांची संधी जाणार नाही, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशाच परीक्षा देतो,’’ असे प्रभू म्हणाले. राज्यात ऑनलाइन सीईटी सुरू झाल्यापासून काठिण्य पातळी वाढली आहे. २०१७ ची परीक्षा मला आतापर्यंत सर्वात कठीण वाटली होती. प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मिळत नाहीत. ढोबळपणे साचा एक असला तरी त्यात बदल होत असतात, नवे संदर्भ असतात, प्रश्नांचे स्वरूप काही वेळा वेगळे असते, असेही प्रभू यांनी सांगितले.

दरवर्षी सीईटी परीक्षा देणे मलाही आव्हानात्मक वाटते. ही माझी माझ्याशीच स्पर्धा असते. मी प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांप्रमाणेच तयारी करतो.

– शशांक प्रभू