गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेला बेस्टचा संप अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहेत. गेल्या पाच दिवसात अनेक बैठका झाल्या मात्र त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. अशात कामगार नेते शशांक राव यांना या संप कधी मिटणार असे विचारले असता ते म्हटले की प्रशासनासोबत आमची बैठक सकारात्मक झाली, त्यांनी आमचे मुद्दे ऐकून घेतले. मात्र संप सुरू राहील आणि संप सुरु असतानाच वाटाघाटी सुरु राहतील. शशांक राव यांच्या या प्रतिक्रियेमुळे संप सुरु राहणारच हे स्पष्ट झाले आहे.

बोनस द्या, वेतन करार करा, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा अशा अनेक मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. या संपाला शिवसेनेने नैतिक पाठिंबा दिला होता. मात्र एका दिवसात हा पाठिंबा सेनेने काढून घेतला. या प्रकारामुळे संतापलेल्या शिवसेना युनियन सदस्यांनी सामूहिक राजीनामेही दिले आहे. कर्मचाऱ्यांना मेस्मा आणि सेवा निवासस्थाने रिकाणी करण्याची नोटीस राज्य सरकारने बजावली आहे. यामुळे पालिका, बेस्ट प्रशासन यांच्याविरोधात संतापाची लाटच पसरली आहे. या संपात कोणताही सकारात्मक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मुंबईकर वेठीला धरले जात आहेत हे नक्की!